नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वनजमिनींसह शेतजमिनींच्या संरक्षणासाठी उभारलेले तार कंपाऊंड आणि लोखंडी अँगल्स चोरी करून नेणारी टोळी स्थानिक गुन्हेशाखेने (एलसीबी) गजाआड केली आहे. दिवसा पाळत ठेवल्यानंतर शेतजमिनींत रात्री शिरुन लोखंडी अँगल पिकअप वाहनात भरून ही चोरी केली जात होती. यानंतर हे अंगल संगमनेर व अंबड (Ambad) येथील भंगार व्यावसायिकांना किलोदराने विक्री करून चोरटे मौजमजा करत, असे तपासात समोर आले आहे.
रतन चिमा माळी (रा. पास्ते ता. सिन्नर) असे टोळीच्या सूत्रधाराचे नाव असून तो इर्षाद उर्फ लंबू मसुदअली (रा गोजरे मळा, सिन्नर, मुळ रा. कानपूर), कल्पेश पांगळू साबळे (रा. एसटी कॉलनी, सिन्नर) यांच्यासह लोखंडी मालमत्तेची चोरी करुन भंगार खरेदीदार मनावर महंमद अली (रा. अंबड, नाशिक) याला विक्री करत होते. सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगारवाडी येथील बनक्षेत्रातील राखीव जमीनींच्या संरक्षण सीमाव अन्य शेतजमिनीव रानातून तारकंपाऊंड व लोखंडी अंगलीची चोरी झाली होती. याबाबत गुन्हा (Case) दाखल करण्यात आला होता.
तर अशाच स्वरुपाच्या चोरीचे सिन्नर पोलिसांत एकूण ६ गुन्हे दाखल होते. चोरट्यांच्या अशा धुमाकुळीने शेतकरी व वनखाते त्रस्त होते. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा समांतर तपास सिन्नर व स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने सुरु केला. तेव्हा पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना टोळीचा म्होरक्या व रेकॉर्डवरील सराईत रतन माळी व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. यानुसार एलसीबीच्या (LCB) पथकाने पास्ते शिवारात सापळा रचून चोरी करण्यासाठी वापरली जाणारी पिकअप (एमएच ४२ बी ३७३४) पकडून ताब्यात घेतली. तपासणीदरम्यान, पिकअपमध्ये लोखंडी अँगल व इतर साहित्य आढळले, त्यानुसार संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून कारवाईत (Action) एकूण २ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयित सराईत
या कारवाईमुळे सिन्नरमधील शेतकरी व वनखात्याला दिलासा मिळाला असून संशयितांनी केलेले लोखंड चोरीचे विविध सह गुन्हे उघड झाले आहेत. संशयित माळी, मसूदअली व साबळे, यांच्यावर यापूर्वी सिन्नर तसेच सिन्नर एमआयडीसी पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक निरीक्षक संदेश पवार, सहायक उपनिरीक्षक नवनाथ सानप, अंमलदारविनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम व प्रकाश कासार यांच्या पथकाने ही कारवाई केली.