नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आरपीआयचे नाशिक जिल्हाध्यक्ष व सातपूर येथील माजी नगरसेवक प्रकाश लोंढेंसह (Prakash Londhe) पुत्रांवर खंडणी, लूटमार, गोळीबार व हप्तेवसुलीच्या सातहून अधिक गुन्ह्यांमुळे मोक्का कारवाई झाली असतानाच आता त्यांच्या एकूणच अन्याय व अत्याचाराविरोधात अनेक तक्रारदार बेधडकपणे पोलिसात (Police) तक्रारी मांडण्यास समोर येत आहेत.
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) मौजे मोह गावात राहणाऱ्या मच्छिंद्र बोडकेंसह भाऊबंदाची तब्बल सव्वानऊ एकर (चार हेक्टर) जमीन बळकवल्याप्रकरणी सातपूर पोलिसात (Satpur Police) प्रकाश मोगल लोंढे व मुलगा दीपकसह प्रमोद मनोहर आव्हाड व गणेश श्रीधर आडके व इतर दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातही संशयितांना नव्याने अटक केली जाणार आहे. मोह गावातील मच्छिंद्र रघुनाथ बोडके यांच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०११ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत लोंढेंच्या स्वारबाबा नगरातील धम्मतीर्थ कार्यालयासह सिन्नरच्या उपनिबंधक कार्यालयात हा प्रकार घडला.
लोंढेंसह अन्य १३ संशयितांनी बोडकेंसह त्यांच्या भाऊबंदांना ठार मारण्याची धमकी देऊन रिव्हॉल्व्हर रोखले. हा धाक दाखवत सर्वांना जबरीने वाहनांमध्ये बसवून सिन्नरच्या उपनिबंधक कार्यालयात (Office) नेले. त्यानंतर मौजे मोह गावातील ४ हेक्टर ९० आर वडिलोपार्जित सामायिक शेतजमीन (Land) जबरीने लाभात लिहून घेत कब्जा केला.
अपहरण करून दीड कोटी उकळले
उपनिबंधक कार्यालयात नोंदी करून लोंढे गँगने बोडकेंसह भाऊबंदांना पुन्हा वाहनात बसवून थेट सातपूरच्या धम्मतीर्थ कार्यालयात नेत दीपक लोंढे (Deepak Londhe) याने मारहाण केली. भीती दाखवून रात्री नऊ वाजेपर्यंत डांबून ठेवले. बोडकेंसह भाऊबंदांची सुटका झाली असता त्यांनी तीन वर्षांनंतर लोंढेंकडे शेतजमीन परत मागितली असता ती परत करण्याच्या बदल्यात तब्बल तीन कोटी रुपयांची मागणी केली. ती पूर्ण न केल्यास जमिनीचा नाद सोडण्याचा व ठार मारण्याची धमकी देत दीड कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कागदोपत्री नोंदीनुसार, बोडके यांना पन्नास लाख रुपये देण्याचे कबूल करूनही ते पैसे दिले नाहीत.
ठळक मुद्दे
- लोंढे टोळीतील प्रमोद आव्हाड, गणेश आडकेचे नाव समोर
- पसार संशयितांचा शोध सुरू
- लोंढेंची मालमत्ता सील करण्याची तयारी
- वरील गुन्ह्याचा स्वतंत्र तपास





