नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भांडण सोडविण्याच्या कारणातून संशयितांनी (Suspected) रिक्षाचालकावरच धारदार हत्याराने सपासप वार केले. गंभीररित्या जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा (Rickshaw Driver) उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. १२) पहाटे मृत्यु झाला आहे. याप्रकरणी संशयित टोळक्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संशयितांना अटक करुन कठाेर शिक्षेची मागणी सूर्यवंशी यांच्या कुटुंबासह नातलग व परिसरातील नागरिकांनी करुन शनिवारी सकाळी सातपूर पाेलीस ठाण्यात ठिय्या आंदाेलन केले.
संघर्ष मोरे, प्रेम संदीप जाधव, प्रमोद भगत व त्यांचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात प्रकाश मधुकर सूर्यवंशी (४२, रा. छाया हाईटस्, श्रमिकनगर, सातपूर. मूळ रा. भगूर, नाशिक) यांचा मृत्यू (Death) झाला आहे. सुवर्णा प्रकाश सूर्यवंशी (३५) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.१०) रात्री साडेआठला त्यांचे पती रिक्षा घेऊन घरी आले. त्यानंतर जेवण करून ते पार्किंगमध्ये मित्र गणेश उत्तम पाटील यांच्याशी रिक्षेत गप्पा मारत होते. त्यावेळी धर्माजी कॉलनीतील संशयित कोयते व अन्य हत्यारे घेऊन आले आणि त्यांनी गणेश पाटील याला दमदाटी करुन वाद घातला.
त्यावेळी प्रकाश हे वाद सोडवत असताना, संशयितांनी गणेशला सोडून प्रकाश यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. ते पाहून गणेश पाटील पळून गेला. त्यामुळे अधिकच चिडलेल्या संशयितांनी प्रकाश यांना जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर, जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर शनिवारी (दि. १२) पहाटे एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी सातपूर पोलिसात (Satpur Police) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सूर्यवंशी यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. संशयितांच्या शाेधार्थ पोलीस मागावर रवाना झाले आहे. या खुनाच्या (Murder) घटनेमुळे कामगार वस्तीमध्ये घबराटीचे वातावरण आहे.