नाशिक | भारत पगारे | Nashik
शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेच्या चारही युनिटकडून मोटार वाहन अधिनियमांतर्गत जनजागृती व प्रबोधन केले जात असतानाच बेशिस्त वाहनधारकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार जानेवारी ते नोव्हेबर २०२४ या अकरा महिन्यांत सीटीबी अर्थात शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनधारकांरवर तब्बल १,५४,५१५ केसेस करुन ८,०१,७२७०० रुपयांचा दंड आकारला आहे. विशेष म्हणजे, कारवाईच्या अग्रभागी ४६,०५१ विनाहेल्मेटचालक रडारवर राहिले आहेत.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला खीळ घालणाऱ्या वाहनधारकांवर दरवर्षी कारवाई केली जाते. विनाहेल्मेट वाहन चालवणे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, सीटबेल्ट न वापरणे, नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करणे, सिग्नल जम्प करुन झेब्रा क्रॉसिंगचे नियम पायदळी तुडवण्यास अन्य मोटार वाहन कायदा व अधिनियमानुसार गुन्हे नोंद केले जातात. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या सूचनेने सहायक आयुक्त सुधाकर सुराडकर व चार सीटीबी युनिटच्या वरिष्ठ निरीक्षकांनी आपापल्या हद्दीत वाहतूक नियमनासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक आणि चालकांवर कारवाई आरंभली आहे.
दरम्यान, ही कारवाई निरंतर सुरु असतानाच, ३ ते ९ एप्रिल आणि २२ ते २८ एप्रिल दरम्यान विशेष मोहिम राबवून दंडात्मक कारवाई केली. यानंतरही १८ डिसेंबरपासून विशेष ड्राईव्ह घेण्यात येऊन पथकांकडून कारवाई सुरू केली. यात ४६० बेशिस्तांवर कारवाई करीत २ लाख ६९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
मोबाईल कारवायांना सूट?
शहरातून कुठेही जातांना आपल्याला बहुतांश दुचाकी, कार आणि प्रवासी बसेस आणि ट्रकचालक बेदिक्कतपणे ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करतात. त्यात अनेकदा अपघात घडून जीव गमावावा लागतो. काही घटनांत तर दोष नसतानाही एखाद्याचा जीव जातो. असे असताना वाहतूक शाखेने मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांना काहीशी सूट दिल्याचे आकडेवारीतून दिसते. अकरा महिन्यांत केवळ ८०३ चालक आढळले असून त्याखालोखाल झेब्रा लाईन क्रॉस करणाऱ्या फक्त १४३ चालकांवर कारवाई झाली आहे.
अशी झाली सीटीबी युनिटकडून कारवाई
युनिट | एकूण केसेस | एकूण दंड रुपये |
युनिट -१ | ३४, ३०० | २, ५९, ६, ७५० |
युनिट -२ | ६५, १०५ | ४, ४५, ३, २५० |
युनिट -३ | ३४, ९२७ | २०, ७२, ०१००, |
युनिट -४ | २०, १८३ | १, २३, २३, ६०० |
एकूण | १, ५४, ५१५ | ८०, १७, २, ७०० |
वाहतूक नियमांचे उल्लंघन करु नये. वाहतूक शाखेच्या चारही युनिटकडून कारवाई सुरु आहे. वाहतूक नियमांप्रती चालकांत जागृती व्हावी, यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. कुणीही नियम मोडू नयेत. अन्यथा कारवाई अटळ आहे.
चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक, मुख्यालय