Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशिकमध्ये उत्तर प्रदेश पॅटर्न; लोंढेच्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेने चालवला...

Nashik Crime : नाशिकमध्ये उत्तर प्रदेश पॅटर्न; लोंढेच्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेने चालवला बुलडोझर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ऑरा हॉटेल गोळीबारप्रकरणी (Firing Case) पोलीस कोठडीत (Police Custody) असलेला आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) याच्या अनधिकृत बंगल्याच्या बांधकामावर बुधवारपासून नाशिक महापालिका प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून हातोडा चालवण्यास सुरुवात केली. लोंढे याचा आयटीआय पुलाजवळ नंदिनी नदीच्या पूररेषेतील हा बंगला अनधिकृत होता. महापालिकेने दिलेला पाच दिवसांचा अल्टिमेटम (अतिक्रमण काढण्यासाठीची मुदत) संपल्याने महापालिकेने ही कारवाई सुरू केली.

काल (बुधवारी) सायंकाळी प्रथम बंगल्यावरील अनधिकृत बॅनरचा सांगाडा गॅस कटरच्या सहाय्याने काढण्यात आला. त्यानंतर आज (गुरुवारी) महापालिका अधिकाऱ्यांनी पक्के बांधकामावर बुलडोझर चालविला. यावेळी अपर आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त संगीता नांदूरकर यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगद्विंदसिंग राजपूत, प्रकाश अहिरे आणि अतिक्रमण पथक, अग्निशमन दल व दंगल नियंत्रण पथकाचा मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता.

YouTube video player

दरम्यान, या अतिक्रमणप्रकरणी लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल असून, अतिक्रमण काढण्यासाठी येणारा सर्व खर्च लोंढेंकडून वसूल केला जाणार आहे. लोंढे याने तयार केलेले अनधिकृत पक्के बांधकाम तोडण्यासाठी जेसीबी जाण्यासाठी रस्ता नसल्याने तो तयार करण्याचे नियोजन महापालिकेतर्फे करण्यात आले. यानंतर अनधिकृत बंगला जमीनदोस्त करण्यात आला.

बागुलांचीही चौकशी?

विसेमळा गोळीबारप्रकरणात रामवाडीतील ‘बागुल गँग’ वर धडक कारवाई झाली असतानाच, आता एका खंडणी उकळल्या प्रकरणात थेट भाजपचे नेते सुनील बागुल यांच्या ‘श्रमिक माथाडी गार्ड बोर्ड’ संघटनेचे नाव समोर आले आहे. बागुल गँगचा अनिल राजाराम शेंडगे याने श्रमिकच्या नावाखाली ‘दुकानदारी’ चालवून ‘सीटी सेंटर’ मॉलमधील अनेक शोरुम व दुकानचालकांकडून दरमहा दहा हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेंडगेला अटक झाली असून सुनील बागुलांचे पोलीस आयुक्त कार्यालयात वारंवार दर्शन होत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समजते.

ताज्या बातम्या