नाशिक | प्रतिनिधी | Nashik
इंदूर, हरियाणा व उत्तरप्रदेशातून स्वस्तात देशी कट्टे आणूण नाशिकसह (Nashik) राज्यभरात त्याची विक्री करणारा फर्नांडीसवाडीतील सराईत गुन्हेगार (Criminal) आता घरफोडींसह एमडी विक्रीच्या धंद्यात रममाण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पसार असलेल्या फर्नांडीसवाडीतील संशयित सराईत राहुल संदीप सोनवणे (वय ३३) याला नाशिकरोड पोलिसांनी एमडी विक्री करताना रविवारी (दि. २७) अटक (Arrested) केली असून त्याच्याकडून ९८ हजारांचे २९ ग्रॅम एमडी व साडेअकरा लाख रुपयांची कार असा सव्वा बारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्या साथीदारालाही गजाआड करण्यात आले आहे.
राहुल हा रेकॉर्डवरील (Record) सराईत असून त्याच्यावर १८ ते २० विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो रविवारी द्पारी जेलरोड ते बिटको (Jail Road to Bitco) चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संशयित साथीदार केतन पांडुरंग पोले (वय २५, रा. समृद्धी, जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) याच्यासह २९ ग्रॅम मेफेड्रोन घेऊन विक्री करण्यासाठी आला होता. याबाबतची माहिती हवालदार विजय टेमगर यांना मिळाली.
दरम्यान, त्यांनी नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना कळविली असता पथकाने सापळा रचून सोनवणे व पोले यांना कारसह ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, एमडी व मोबाईल आढळून आले. पंचनामा करुन त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा नोंदवून अटक केली असून दोघांना न्यायालयाने (Court) पोलीस कोठडी सुनावली आहे.
राहुलचा धंदाच
राहुल हा पूर्वी नाशिकमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी कुप्रसिद्ध होता. त्यातच चोरी, घरफोडी आणि दरोडे टाकण्यात त्याचा हातखंडा आहे. दरम्यान, काही दिवसांपासून तो पसार असताना पोलीस त्याच्या मागावर होते. आता त्याने हत्यारे विक्री सोडून नुकतेच एमडी विक्रीत पाऊल टाकल्याचे कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासात एमडी विक्रीची पालेमुळे खोदली जाणार आहेत. राहुलने हे एमडी मुंबईतून आणल्याचे समोर आले असून त्याचा साथीदार राहुलने केलेल्या चोरी व घरफोडीतील सोन्याचे दागिने स्वस्तात खरेदी करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे जप्त केलेली कार पोले याची असल्याचे उघड होत असून ती राहुल खरेदी करणार होता, असे समजते.
ठळक मुद्दे
- राहुल हा सध्या बहिणीकडे वास्तव्यास.
- राहलवर उपनगर, नाशिकरोड, अंबड, लासलगाव, अकोला, चोपडा येथे गुन्हे.
- पोलेचा नेमका सहभाग उघड होणार.
- राहुलने आतापर्यंत अर्धा डझन कट्टे विक्री केल्याचा संशय.
- एनडीपीएससह दरोडा, चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांत मास्टरमाईंड




