नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) तीन अट्टल चोरट्यांना (Thieves) अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना नऊ गुन्हे उघडकीस करण्यात यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस उपायुक्त मोनिका राऊत (Monika Raut) यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर रोजी कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तात पोलीस अधिकारी, कर्मचारी व्यस्त असताना नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik Pune Highway) पळसे गाव येथे अज्ञात संशयित चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडून सुमारे दीड लाख रुपयांची देशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या. याचा तपास सुरू असताना नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व गुन्हे शोध पथकाचे विजय टेमगर यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या चोरीमध्ये सेंट्रो कारचा वापर करणाऱ्या एका संशयिताची ओळख पटली. त्याचा शोध गुन्हेशोध पथकाने सुरू केला. गोपनीय माहितीनुसार संभाजीनगर, वैजापूर येथील वंजारगाव येथून रजनीकांत पुंजाराम त्रिभुवन वय २६ या चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्या म्होरक्या बाबतीत विचारणा केली असता तो मुसळगाव, एमआयडीसी सिन्नर या ठिकाणी असल्याचे समजले.
त्यानंतर पोलिसांनी (Police) त्याचे घर तसेच लॉजिंग हॉटेल या ठिकाणी तपासणी केली मात्र तरीही तो मिळून आला नाही. त्यानंतर एका चहा टपरीधारकास आरोपी अश्रफ शेख याचा फोटो दाखविण्यात आला असता त्याने ओळखले व संशयित आरोपी हा पहाटे चहा पिण्यासाठी टपरीवर येत असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलीस असल्याचे समजल्यानंतर त्याने तिथून पळ काढून एका कंपनीच्या भिंतीवर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस कर्मचारी अजय देशमुख व विशाल कुवर यांनी त्याचा पाठलाग करून अश्रफ हमीद शेख याला शिताफीने ताब्यात घेतले व त्यानंतर दिलीप रामदास यादव (वय २८ रा. सिन्नर) याला पकडण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, या तिघा संशयित चोरट्यांनी (Thieves) नाशिकरोड, उपनगर, पंचवटी त्याचबरोबर संगमनेर व श्रीरामपूर या भागात घरफोड्या केल्या असून त्यांच्याकडून चोरलेली सेंट्रो कार, पाच दुचाकी व देशी दारू अशा नऊ गुन्ह्याची उकल करून साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, गुन्हे शोध पथकाचे अविनाश देवरे, विजय टेमगर, आदींनी पार पाडली.