नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक शहरात (Nashik City) बेकायदेशीर गोवंश वाहतुकीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) कंबर कसली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत १५ गायी, ८ बैलांची सुटका करत ६ पिकअप वाहने जप्त करण्यात आली असून सुमारे १५ लाख, ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२२ मेपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत नाशिक पुणे महामार्गावरील शिंदेगाव टोलनाका (Shindegaon Toll Both) येथे नाकाबंदी करण्यात आली होती. गुप्त माहिती आणि नागरिकांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर पशु वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता व पशुधन संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आढळलेले प्रमुख दोष म्हणजे पशुधन वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या अधिकृत परवानग्यांचा अभाव, तसेच गायी-बैलांची अयोग्य व अमानुष पद्धतीने वाहतूक, जप्त करण्यात आलेले पशुधन सुरक्षित गोशाळेत हलविण्यात आले असून या प्रकरणांचा तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, राहुल काकडे, गणेश हिरे, अविनाश देवरे, विजय टेमगर, विष्णू गोसावी, अनिल पवार, प्रवीण बोडके, बाळकृष्ण सोनवणे, सचिन सगळे, अंचादास केदारे, नितीन भामरे, नाना पानसरे, अजय देशमुख, विशाल कुबर, समाधान बाजे, संतोष पिंगळ, लक्ष्मण पानसरे, योगेश रानडे यांनी कामगिरी बजावली.