नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या (Trimbakeshwar Police) हद्दीतील तळेगाव शिवारातील स्वामी समर्थ केंद्राच्या आवारात रविवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास घडलेल्या थरारक दरोड्याचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना (Nashik Rural Police) यश आले आहे. तक्रारदाराने तातडीने ‘डायल ११२’ वर संपर्क साधताच, पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत हालचाली करत दरोडेखोरांचा लोकेशन आणि घटनाक्रमानुसार पाठलाग करून ११ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या ११ पैकी तब्बल ९ संशयित हे १८ ते २१ या वयोगटातील असून, ते इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील स्थानिक रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
तळेगाव शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळील साईटवर २६ जुलै रोजी पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास १० ते १२ अज्ञात दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून प्रवेश केला. त्यांनी साईट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुळे व तेथील साक्षीदारांना तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, कटर आणि कोयता यांसारख्या जीवघेण्या हत्यारांचा धाक दाखवला. साक्षीदारांना गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने बाजूला नेऊन, दरोडेखोरांनी त्यांचे ५ मोबाईल, साईटवरील महिंद्रा ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रीक सबस्टेशनसाठी लागणारे ‘एसक्यूएमएम’ कंडक्टर वायरचे दोन ड्रम असा एकूण ११ लाख ११ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.
घटनेनंतर फिर्यादी ज्ञानेश्वर सुळे यांनी क्षणात ‘डायल ११२’ या आपत्कालीन प्रणालीवर कॉल करून माहिती दिली. कॉल मिळताच नियंत्रण कक्षाने तातडीने त्र्यंबकेश्वर पोलिसांना अलर्ट केले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे (Trimbakeshwar Police Station) पोलीस निरीक्षक, दुय्यम अधिकारी व गस्तीवरील अंमलदारांनी मिळालेल्या लोकेशन आणि दरोडेखोरांच्या पळण्याच्या दिशा-घटनाक्रमानुसार तातडीने सरकारी वाहनाने पाठलाग सुरू केला. पोलिसांनी चहूबाजूंनी नाकाबंदी करत सापळा रचला आणि दरोडेखोरांना पळून जाण्याच्या आधीच बेड्या ठोकल्या.
सर्वच संशयित वाडीवऱ्हेचे
विशेष म्हणजे, या दरोड्यात पकडण्यात आलेल्या ११ पैकी तब्बल ९ संशयित हे १८ ते २१ वयोगटातील असून ते वाडीवऱ्हे गावातील स्थानिक रहिवासी आहेत. वाडीवऱ्हे येथील संशयित गणेश कैलास कातोरे (१९), अथर्व संजय सारूक्ते (१९), समाधान शिवाजी मालुंजकर (१८), पियुष अंबादास गवते (१८), कुणाल शरद चोथे (१९), शेखर जीवन अस्वले (१८), अजय जीवन चोथे (१९), मनोज शांताराम मुर्तडक (२०) आणि रोशन खंडू पाटील (३०) असून मनीष मदन सिंग (२१, रा. अंबड, नाशिक) आणि योगेश कुमार सिताराम कुमार (३४, रा. अंबड लिंक रोड, नाशिक) हे अंबड परिसरातील आहेत.
६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल
दरोड्यात चोरलेला महिंद्रा ट्रॅक्टर, वायरचे ड्रम, ५ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे (लोखंडी कटर, कुऱ्हाड, तलवार, कोयता, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर) असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, अपर अधीक्षक विमला एम. यांच्या सूचनेने पाेलिसांनी केली आहे.




