नाशिक | प्रतिनिधी
नववर्ष स्वागताच्या दिवशी ३३३ झिंगाट तळीरामांवर कारवाई नाशिक शहरात करण्यात आली. या कारवाई ड्रंक आणि ड्राईव्ह, दारूबंदी कायद्याचे उल्लंघन, तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन व नशा करून शांततेचा भंग याप्रकणी केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
नाशिक शहरात नववर्ष स्वागत शांततेत पार पडावे यासाठी ठिकठिकाणी शहरात 2 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येपासून शहरात वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचार्यांसह संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांची चोख नाकाबंदी ठेवली होती.
रात्रीत १५३६ वाहनांची तपासणी करण्यात आली यापैंकी १४१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून २९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुसरीकडे १८७ तळीरामांवर ड्रंक आणि ड्राईव्हच्या केस दाखल करण्यात आल्या आहेत.
याच कारवाईत३३ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच शहरातील ६१ लॉजिंगची तपासणीदेखील करण्यात आली. तसेच १२० केसेस नशा करून शांततेचा भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ३ दारूबंदी कायद्याचे उल्लंघन, १ तंबाखुयुक्त पदार्थांचे सार्वजनिक ठिकाणी सेवन याच्याही कसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
शहरातील मुंबई नाका, जेहान सर्कल, अंबड टी पॉईंट, कॅनडा कॉर्नर, मायको सर्कल, गंगापूर यासह सुमारे ४० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदीवेळी पोलिसांकडून दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. वाहनचालकांकडे वाहन व चालक परवाने तपासली जात होती. तर रात्री 8 वाजेनंतर मात्र पोलिसांनी ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून चालकांची मद्याची तपासणी केली.
थर्टीफस्टच्या बंदोबस्तासाठी शहरातील 150 पोलीस अधिकारी आणि एक हजार 500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होतेे. पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक जवानांसह स्ट्रायकींग फोर्स आणि अचानक उद्भवणार्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी देखील तैनात होती. तर शहर वाहतूक शाखेतर्फे महामार्ग, औरंगाबादरोड, पुणे रोड, त्र्यंबकरोड, गंगापूररोड, कॉलेजरोड, पेठरोड, दिंडोरीरोड, शहरातील चौक व प्रमुख रस्त्यांवर ४० ठिकाणी नाकाबंदी केली होती़.
या नाकाबंदीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे 15 अधिकारी व 272 कर्मचारी तैनात करण्यात आले होते 15 ब्रेथ अॅनालायझरच्या साहायाने मद्यपी वाहनचालकांची कडक तपासणी करण्यात आली.