
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मराठा विद्या प्रसारक (मविप्र) या नाशिकमधील (Nashik) नामांकित शैक्षणिक संस्थेची गंगापूर रोड (Gangapur Road) येथील कोट्यवधी रुपये किमतीची १४ हजार ४८६ चौरस मीटर जमीन संकटात असल्याचे भासवून, संस्थेचे बनावट कागदपत्रे (Fake Document) व नोटरीद्वारे सात कोटी रुपयांचा बनाव रचून २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात मुख्य संशयित व कायदेशिर सल्लागार भूषण शेवाळेसह पाच जणांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित भूषण शेवाळे आणि त्याच्या साथीदारांनी मविप्र संस्थेचे बनावट लेटरहेड, शिक्का आणि सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची बनावट सही व फोटो वापरून एक खोटा समजूत करार (एमओयू) तयार केला. मविप्र संस्थेने गंगापूर रोड येथील जमीन बँकेत तारण ठेवून कर्ज (Loan) घेतले होते व कर्ज न फेडल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मविप्रच्या विरोधात निकाल दिला आहे, असा खोटा दावा या कागदपत्रांमध्ये करण्यात आला हाेता.
हा लढा न्यायाधिकरणात (डीआरटी) लढण्यासाठी मविप्र संस्थेने संशयित भूषण शेवाळे याची लिगल असिस्टंट म्हणून नेमणूक केली असून त्याला सात कोटी रुपये फी देण्याचे ठरले आहे, असा बनावट नोटरी केलेला कागद तयार करण्यात आला. विश्वास बसावा म्हणून अपर जिल्हाधिकाऱ्यांचा (Collector) एक मूळ आदेशही बनावट तयार करण्यात आला. जो तपासात एका बँकेच्या भलत्याच खटल्याचा असल्याचे उघड झाले. संशयितांनी हे बनावट कागदपत्रे दाखवून ठाकरे यांना बोलून स्वस्तात प्लॉट काढून देताे, असे सांगत जाधव पिता-पुत्रांकडून (रा. वडाळीभोई, चांदवड) २१ लाख रुपये उकळले.
असा उघड झाला प्रकार
जाधव पिता-पुत्रांनी थेट मविप्र कार्यालयात जाऊन सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे (Nitin Thackeray) यांची भेट घेऊन नोटरीचा कागद दाखवला. या कागदावर स्वतःची बनावट सही आणि सात कोटींच्या व्यवहाराचा मजकूर पाहून ठाकरे यांना धक्का बसला. त्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता असा कोणताही आदेश मविप्रविरुद्ध झाला नसल्याचे स्पष्ट झाले. संस्थेचे नाव वापरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ॲड. नितीन ठाकरे यांनी स्वतः सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police) फिर्याद नाेंदविली.
वकील, नाेटरी करणारे गाेत्यात
भूषण गमनराव शेवाळे (रा. गंगापूर रोड, नाशिक, मूळ रा. सावंदगाव, ता. मालेगाव), अमोल एन. बिडवे, ॲड. अश्विनी एस. गायकवाड, बनावट एमओयू व नोटरी करून देणारा ॲड. नोटरी तसेच ए. आय. शेख यांच्याविरुद्ध सरकारवाडा पाेलिसांत साेमवारी (दि. ३१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत. संशयितांना नाेटीस बजावण्यात आल्या असून अटकेची कार्यवाही सुरु झाली आहे.




