मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
येथील सहकार निबंधक कार्यालयात (Office of the Registrar of Cooperatives) विशेष लेख परीक्षक वर्ग २ अधिकारी म्हणून कार्यरत असणार्या एका महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा दिलीप ठाकरे (वय ५५) असे आत्महत्या केलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या विशेष लेख परीक्षक वर्ग २ या पदावर कार्यरत होत्या. आज (गुरुवारी) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यांनी कार्यालयातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपले आयुष्य संपवले.
दरम्यान, महिला शिपाई कामासाठी कार्यालयात आली असता तिला प्रतिभा ठाकरे यांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे निर्दशनास आले. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून कार्यालय ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
जावयासोबत झाले होते शेवटचे बोलणे
काल (बुधवारी) रात्री प्रतिभा ठाकरे यांचे त्यांचे जावई महेश भोये यांच्यासोबत शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी कार्यालयात येत आत्महत्या केली. ठाकरे यांना एक मुलगा आणि मुलगी असून, त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. मुलगा सातारा जिल्ह्यातील लोनंद येथे खासगी कोचिंग क्लासेस घेतो.
मानसिक दबावामुळे आत्महत्या केल्याचा संशय
दरम्यान, जवळपास सहा कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी प्रतिभा ठाकरे यांच्यावर होती. हे लेखा परीक्षण लवकर पूर्ण करून देण्याचा दबाव त्यांच्यावर होता, यामुळे त्या मानसिक तणावात होत्या. या मानसिक दबावामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय ठाकरे यांचे जावई भोये यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.




