Wednesday, October 21, 2026
HomeनाशिकNashik Crime News : तुरुंग शिपायाला मारहाण करत धमकावले; नाशिकरोड कारागृहात टोळ्यांची...

Nashik Crime News : तुरुंग शिपायाला मारहाण करत धमकावले; नाशिकरोड कारागृहात टोळ्यांची मुजोरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हायसिक्युरिटी तैनात असलेल्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Jail) सराईत गुन्हेगार आणि टोळ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. १९ मार्च २०२५ (रंगपंचमी) रोजी पुणे रोडवरील आंबेडकरवाडी येथे प्रशांत व मुन्ना जाधव या सख्ख्या भावांची निर्घृण हत्या (Murder) केल्याच्या आराेपात तुरुंगात असलेल्या गरड, रेडेकर आणि गोलेकर टोळीच्या संशयितांनी थेट तुरुंग शिपायालाच मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

२७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी यार्ड क्रमांक ५ ते ८ मध्ये कारागृह अधीक्षकांची संचारफेरी सुरू होती. त्यानिमित्ताने परिसरात साफसफाई सुरू असताना सर्कल क्रमांक पाचवर कार्यरत असलेले फिर्यादी कारागृह शिपाई नितीन हेमके हे न्यायालयीन बंद्यांना आंघोळ व इतर दैनंदिन कामे पूर्ण करण्यास सांगत होते. याचा राग आल्याने न्यायालयीन बंदी संशयित शुभम शहाराम लोखंडे, रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर, अविनाश नानाजी उशीरे, अनिल विष्णू रेडेकर, सागर मधुकर गरड आणि अनिकेत विजय सोमवंशी यांनी एकत्र येत शिपायाला खाली पाडून हाताचापाटाने मारहाण केली. परत या सर्कलला ड्युटी घेतली तर तुझ्याकडे पाहून घेऊ, असा दम भरत त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार भोळे तपास करत आहेत.

​टोळीयुद्धाची भीती अन् धावपळ

सुमीत पगारे हत्येतील संशयित आणि विरोधी गटात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रक्तरंजित टोळीयुद्ध भडकू नये, म्हणून अवघ्या २४ तासांपूर्वीच तब्बल १२ संशयितांची छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार आणि धुळे कारागृहात तातडीने रवानगी करण्यात आली होती. एकीकडे संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी प्रशासन कैद्यांची हलवाहलव करत असताना, दुसरीकडे मात्र उर्वरित टोळीने थेट तुरुंग कर्मचाऱ्यांवरच हल्ला करून प्रशासनाला उघडे पाडले आहे.

धाक संपल्याचे चित्र

यापूर्वीही नाशिकच्या तुरुंगात वेगवेगळ्या टोळ्यांनी राडे घालून अनेक तुरुंग अधिकारी व शिपायांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या प्रकारांमुळे कारागृह कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत असून, कायद्याचा बडगा दाखवणाऱ्या रक्षकांवरच गुन्हेगार हावी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारागृह अधीक्षकांची संचारफेरी सुरू असतानाच ही मारहाण झाली, यावरून गुन्हेगारांमध्ये प्रशासनाचा अथवा पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही हेच सिद्ध होते. अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या या मध्यवर्ती कारागृहात गुंडांवर वचक बसवण्यासाठी कायदेशीर कारवाई आणि अंतर्गत सुरक्षेचे पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : धर्म, अहंकार आणि सिंहस्थ

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकच्या पवित्र भूमीत येत्या ३१ ऑटोबरला होणारा सिंहस्थाच्या ध्वजारोहणाचा सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नाही,...