नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून मित्र-मैत्रिणींचे जाळे विणणाऱ्या ‘युनिगॅदर’ समुदायाचा आधार घेत एका ३३ वर्षीय नराधमाने महिलेवर अत्याचार (Rape) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत पीडितेवर नाशिक आणि मुंबईत अत्याचार करण्यात आले असून, याप्रकरणी संशयित सिद्धार्थ पवार (रा. इंदिरानगर, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला मुंबईतील (Mumbai) बोरिवली परिसरातील (Boriwali Area) रहिवासी आहे. तिने इन्स्टाग्रामवरील ‘युनिगॅदर’ या पेजला फॉलो केले होते. हा समुदाय अनोळखी व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या भेटीगाठी आणि सहलींचे आयोजन करतो. याच ग्रुपच्या एका गेट-टुगेदर दरम्यान संशयित सिद्धार्थ पवार याने पीडितेचा मोबाईल क्रमांक मिळवला. सुरुवातीला मैत्रीच्या नात्याने संवाद साधून सिद्धार्थने पीडितेवर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही काळातच त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा पाठलाग सुरू केला.
दि. ५ ते २५ एप्रिल या कालावधीत हा अत्याचार सुरू होता. सिद्धार्थने पीडितेस विश्वासात घेऊन तिला गुंगीकारक पेय पाजले आणि बेशुद्धावस्थेत असताना तिच्यावर अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, पीडितेने प्रतिकार केला असता तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. “जर पोलिसांत (Police) तक्रार केली तर गाडीखाली चिरडून जीवे मारीन,” अशी धमकी देत त्याने तिला तब्बल २० दिवस मानसिक आणि शारीरिक त्रासात ठेवले.
झिरो एफआयआरनंतर गुन्हा वर्ग
पीडितेने सुरुवातीला मुंबईतील दहिसर पालीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. मात्र, मुख्य घटना नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीत घडल्याने, कायदेशीर प्रक्रियेनुसार हा गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
सावधगिरी बाळगणे गरजेचे
‘युनिगॅदर’ सारखे ग्रुप एकटेपणा घालवण्यासाठी किंवा नेटवर्क वाढवण्यासाठी तयार केले जात असले तरी अशा व्यासपीठांवर वावरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या घटनेने सोशल मीडियावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




