नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मैत्रिणीला दिलेले लाखभर रुपये परत मागणे एका २५-२६ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik) समोर आला आहे. हक्काचे पैसे परत द्यावे लागू नयेत म्हणून संबंधित तरुणी आणि तिच्या भावांनी ‘तू आमच्या बहिणीचे न्यूड (अश्लील) फोटो तयार केलेस, तुला सोडणार नाही, तू मरून जा’ असा बनाव रचून धमकी दिल्याने नैराश्यात आलेल्या वरुण भाऊसाहेब भामरे (वय २६, मूळ रा. पिंपळकोटे, ता. बागलाण, सध्या रा. गोकुळ अपार्टमेंट, ध्रुवनगर, गंगापूर रोड) या तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे.
आत्महत्येपूर्वी वरुणने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या नावे चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून न्यायाची आर्त साद घातली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित मैत्रिण आश्लेषा शिंदे, तिचा भाऊ अक्षय कडलग आणि अविनाश गायकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व वरुणचे वडिल भाऊसाहेब बाळू भामरे(वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वरुण हा खासगी नोकरीच्या शोधात होता, तर संशयित आश्लेषा शिंदे ही एका खासगी फर्ममध्ये काम करते. ओळखीच्या काळात आश्लेषाने वरुणकडून टप्प्याटप्प्याने सुमारे एक लाख रुपये घेतले होते. हे पैसे वरुणने परत मागितले असता, ते परत करण्याची कुवत व इच्छा संशयितांची नव्हती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आश्लेषाच्या मोबाईलचा (Mobile) ॲक्सेस वरुणकडे होता. हीच बाब हेरून संशयितांनी कट रचला. १९ ऑगस्ट रोजी संशयित अक्षय कडलग आणि अविनाश गायकर यांनी वरुणला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. “तुला वनटाईम पैसे मिळणार नाहीत,” असे सांगत “तूच तिचे न्यूड (अश्लील) फोटो बनवलेस, आम्ही तुला सोडणार नाही. तू मरून जा” अशी धमकी दिली. पैसे तर बुडालेच, शिवाय चारचौघात चारित्र्यावर शिंतोडे उडवून गंभीर आरोपात अडकवण्याचा कट रचल्याचे लक्षात आल्याने वरुण मानसिकदृष्ट्या खचला. गुरुवारी (दि. २०) दुपारी त्याने ध्रुवनगरातील गोकुळ अपार्टमेंटमधील घरात गळफास घेतला. त्यास रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
वरुणने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. ”माझ्या मरण्यामागे आश्लेषा शिंदे, अक्षय कडलग व अविनाश गायकर हे जबाबदार आहेत. मी मान्य करतो की मी तिच्या मोबाईलचा ॲक्सेस घेतला होता, पण काल त्यांनी मला रस्त्यात मारून धमकी दिली की तू मर, नाहीतर माझ्या बहिणीचे न्यूड फोटो तु बनवलेस असे म्हणत धमकी दिली. तिचे फोटो मी बनवले असा आरोप करून त्यांना माझे पैसे द्यायचे नाहीत. तिने मला प्रेमात फसवले व हवे तेवढे पैसे काढून घेतले. मी माझे पैसे मागितले तर ‘तुझी वाट लावू’ अशी धमकी दिली. संदीप कर्णिक सर, माझी तुम्हाला विनंती आहे, हे मोठे माणसे पैशाच्या जीवावर काहीही करू शकतात, पण मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मला न्याय मिळावा आणि यांना शिक्षा व्हावी…”
दोघे पोलिसांच्या ताब्यात, एक पसार
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुसाईड नोट आणि फिर्यादीवरून मध्यरात्री एक वाजता संशयितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिसांनी संशयित तरुणी आश्लेषा शिंदे आणि तिचा नातलग अविनाश गायकर या दोघांना ताब्यात घेतले असून, अक्षय कडलग हा पसार झाला आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.




