Monday, October 19, 2026
HomeनाशिकNashik Crime News : ​एआयच्या मदतीने केले ३८ गुन्हे; दहावी पास ओला...

Nashik Crime News : ​एआयच्या मदतीने केले ३८ गुन्हे; दहावी पास ओला कॅब चालकाला म्हसरूळ पोलिसांकडून अटक

वर्क इंडिया पोर्टलवर बोगस प्रोफाइल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त वर्क इंडिया (Work India) या नोकरीविषयक संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल तयार करून राज्यभरातील तरुणांना लाखाे रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका हायटेक चाेरट्याचा म्हसरूळ पोलिसांनी (Mhasrul Police) पर्दाफाश केला आहे. अवघा दहावी पास असलेला व बदलापूर येथे ओला कॅब चालवणारा संशयित राहुल दीपक धुळे उर्फ अमोल सोनवणे (वय २४, रा.जुवेली गाव, बदलापूर पूर्व) या मुख्य संशयितास पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले.

- Advertisement -

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) अर्थात चॅटजीपीटी व इतर एआय टूल्सचा वापर करून पोलीस तपासाला चकवा देणारा हा चाेरटा राज्याच्या सायबर गुन्ह्यांत सराईत निघाला असून, त्याच्याविरोधात गृह मंत्रालयाच्या एनसीसीआरपी पोर्टलवर महाराष्ट्रातील ३८ गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित राहुल धुळे हा अवघा दहावी उत्तीर्ण आहे, मात्र तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्यात तो तरबेज होता. त्याने चॅटजीपीटी आणि इतर एआय साधनांचा वापर करून केंद्र सरकारच्या वर्क इंडिया पोर्टलवर विविध नामांकित कंपन्यांच्या नावाने बोगस प्रोफाईल तयार केले. त्यावर स्वतःचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अपडेट करून आकर्षक पगाराच्या नोकरीच्या ऑफर्स पोस्ट केल्या.

नोकरीच्या (Job) शोधात असणाऱ्या बेरोजगारांनी या क्रमांकांवर संपर्क साधताच, त्यांना एआय द्वारे तयार केलेली हुबेहूब बनावट अपॉइंटमेंट लेटर्स व जॉईनिंग लेटर्स पाठवून जाळ्यात ओढले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (परिमंडळ १) मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (पंचवटी) शेखर देशमुख यांनी सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक धीरज गवारे व तपास पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल क्रमांकांचे आणि ई-मेल आयडीचे तांत्रिक विश्लेषण करुन ही कारवाई केली.

​४० हजारांपासून ७ लाखांपर्यंत उकळले

​महाराष्ट्रातील गरजू व बेरोजगार तरुणांना मोठ्या कंपन्यांत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने प्रत्येकाकडून ४० हजार रुपयांपासून तब्बल ७ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळली. म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका गुन्ह्यात त्याने फिर्यादीची ६ लाख ४५ हजार ५३१ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.  तसेच अंबड पाेलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याची उकल झाली आहे.

​म्यूल बँक खाती, भावाची साथ

​पैसे उकळण्यासाठी आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी संशयिताने अनेक ‘म्यूल बँक अकाऊंट्स भाड्याने घेतली अथवा दुसऱ्यांच्या नावे असलेली बँक खाती वापरली आहे. या नेटवर्कमध्ये त्याचा चुलत भाऊदेखील सहभागी असल्याचे तपासात समोर आले असून, तो सध्या पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुख्य संशयिताला जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हा मुद्देमाल जप्त

​४ मोबाईल फोन
​१३ सिमकार्ड्स
​१२ विविध बँकांचे डेबिट व क्रेडिट कार्ड्स
​२ विविध बँकांचे चेकबुक

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 225 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2328 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब...