दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
नातेसंबधांचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Rape) करुन पीडिता गरोदर राहून प्रसुत झाल्याचा आरोप सिद्ध झाल्याने मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणार्या नराधमास आजन्म कारावास (life imprisonment) व दोन हजार रुपये दंड, तसेच तो न भरल्यास दोन महिने साधी कैद व पीडितेला दोन लाख रुपयांच्या भरपाईची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) सुनावली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये कुर्णोली शिवारात सदर घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाळू यशवंत जाधव (वय ४२) रा. धोंडमाळ, ता. पेठ याने बळजबरीने पीडितेच्या आई व भावांना जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडिताही आरोपीची चुलत भाची असून तिची आई व वडील यांचेबरोबर पीडिताही कामास होती. याच ठिकाणी आरोपी हा काम करत होता. नातेसंबध व ओळखीचा गैरफायदा घेत पीडितेवर वेळोवेळी केलेल्या अत्याचारानंतर ती गर्भवती (Pregnant) झाली, प्रसुत होऊन तिला मुलगाही झाला.
दरम्यानच्या कालावधीत याची वाच्यता करु नये, अशा धमक्या आरोपीकडून (Accused) पीडितेला देण्यात आल्या होत्या. अवघे चौदा वर्ष सात महिने वय असलेल्या अल्पवयीन पीडितेने दिंडोरी पोलिसात फिर्याद दिल्याने बाळू जाधव याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यास ०५ फेब्रुवारी २०२३ रोजी अटक (Arrested) करण्यात आली होती. यानंतर दोषारोप पत्र सादर करताना न्यायालयात सबळ पुरावे दाखल करण्यात आले होते.