Tuesday, August 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ड्रग्ज माफियांचा थरार; पोलिसांकडून पाठलाग, मेफेड्रोनसह तिघांना बेड्या

Nashik Crime News : ड्रग्ज माफियांचा थरार; पोलिसांकडून पाठलाग, मेफेड्रोनसह तिघांना बेड्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास खाकी वर्दी आणि ड्रग्ज तस्करांमध्ये (MD Drugs) थरारनाट्य पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरुन नाशिकच्या दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ कारमधील डॅशबोर्डमध्ये अत्यंत हुशारीने मॅफेड्रॉन (एमडी) हे अंमली पदार्थ लपवून तस्करी करणाऱ्या तिघांच्या टोळीला आडगाव पोलिसांनी (Aadgaon Police) शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांकडून कार, मोबाईल आणि ड्रग्ज असा एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

कारवाईत पोलिसांनी (Police) सुदाम मुरलीधर सोनवणे (वय २७), विशाल दत्तात्रय बिंदे (२९) आणि विवेक नवनाथ खालकर (२४, सर्व रा. निफाड, जि. नाशिक) या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील मुख्य संशयित सुदाम सोनवणे हा सराईत असून तो कॉन्ट्रॅक्टर आहे, तर बिंदे आणि खालकर हे शेतकरी आहेत. आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार कुणाल राऊत आणि दादासाहेब वाघ यांना (दि. २९) खबऱ्या ड्रग्ज तस्करीची पक्की माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास संशयित कार (क्र. एमएच १५ जेएस ४५९७) महामार्गावरून येताना दिसली.

पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी (Suspected) कारचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने भरधाव वेगाने कारचा पाठलाग सुरू केला. अखेर पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास माडसांगवी टोलनाक्याजवळ पोलिसांनी कारला चारी बाजूंनी वेढून संशयितांना ताब्यात घेतले. कारची कसून झडती घेतली असता, डॅशबोर्डमध्ये लपवलेले ६.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत ३५ हजार रुपये) जप्त करण्यात आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे ड्रग्ज नाशिकमध्ये कोणाला पुरवले जाणार होते ? या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? याचा पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.

सोनवणेच्या अपघातांचा इतिहास

या गुन्ह्यातील मुख्य संशयित सुदाम सोनवणे हा सराईत असल्याचे समोर आले आहे. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास सीबीएस सिग्नल येथील सुरूची हॉटेलजवळ त्याने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार (एमएच १५ जेएच ८७८२) भरधाव व बेजबाबदारपणे चालवून रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचा पोल, महावितरणची डी.पी. आणि पिंपळाच्या झाडाला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात सागर सुदाम शिंदे या तरुणाचा मृत्यू झाला होता, तर कानिफनाथ मंगळूर, विवेक खालकर, अक्षय गोर्ते व अन्य गंभीर जखमी झाले होते. शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. आता तो थेट ड्रग्ज तस्करीत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता...