नाशिक | Nashik
जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात (Trimbakeshwar Taluka) आजही बरीचशी कुटुंबे मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. काही भागांत पाण्याची, रस्त्यांची आणि आरोग्याची व्यवस्था नसल्याने आदिवासी बांधवांची मोठी हेळसांड बघायला मिळते. मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बरड्याची वाडी याठिकाणी एका महिलेला (Woman) उदरनिर्वाहाचे साधन आणि मुलांचा सांभाळ करण्यासारखी परिस्थिती नसल्याने मुलांची विक्री करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव (Take Devgaon) या आदिवासीबहुल पाड्यावर वावी हर्ष येथील बच्चुबाई हंडोगे (४५) या महिलेला तब्बल १४ मुलं आणि मुली झाल्या. यात तिचा दोन वेळेस गर्भपात झाल्याने दोन मुले दगावली. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्याजवळ सध्या एकूण ११ मुले आणि मुली आहेत. यातील सहा मुले आणि मुली तिने विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या महिलेने ४ऑक्टोबर २०२५ ला एका मुलाला जन्म दिला होता. नियमानुसार बाळाची माहिती घेण्यासाठी जेव्हा आशा सेविका तिच्या घरी पोहोचल्या, तेव्हा त्यांना बाळ घरात आढळले नाही.
दरम्यान, याबद्दल विचारणा केली असता, आई बच्चुबाईने “आम्ही बाळाला दूध पाजू शकत नाही, म्हणून त्याला दुसऱ्याला दिले, असे कर्मचाऱ्यांसमोर सांगितले. या घटनेनंतर एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सखोल माहिती घेतली असता, महिलेने यापूर्वीदेखील आणखी दोन मुलांची विक्री केल्याचे किंवा अवैध पद्धतीने हस्तांतरण केल्याचा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी सदर महिलेला घोटी पोलिसांनी पत्नीसह अटक (Arrested) करून अधिक चौकशी सुरु केली आहे. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आता या चौकशी समितीचा अहवाल देखील समोर आला आहे.
महिलेचे म्हणणे काय?
या प्रकरणानंतर महिलेने (Women) माध्यमांना प्रतिक्रिया देतांना सांगितले की, आम्ही मुलांची विक्री केलेली नाही, आमची परिस्थिती हालाखीची असल्याने आम्ही आमच्याच नातेवाईकांकडे मुलांना दत्तक म्हणून दिले आहे. गरोदरपणात कोणतीही आवश्यक घ्यावयाची काळजी आरोग्य विभागाने घेतली नाही. अंगणवाडीतून गरोदरपणात आणि बाळ झाल्यानंतर मिळणारी मदत मिळाली नाही, त्यामुळे बाळाला पोषक दूध देऊ न शकल्याने हे दीड महिन्याचे बाळ नातेवाईकांना सांभाळण्यासाठी दत्तक म्हणून दिल्याचे या महिलेने सांगितले.
विकास आदिवासींचा की आदिवासी मंत्र्यांचा?
आदिवासी समाजाचा विकास व्हावा म्हणून राज्यात स्वतंत्र आदिवासी विभागाची निर्मिती केली. त्या विभागाला एक मंत्री देखील दिला, मात्र आजही या आदिवासी समाजाला पोटाचा गोळा विक्री करून आपल्या कुटुंब चालवावे लागत असेल तर यासारखे दुर्दैवी काय? या महिलेचे इतर मुले कुठे आहेत या सर्व मुलांचा तपास करावा आणि या कुटुंबाला शासकीय योजनापासून वंचित ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणेवर कारवाई करावी, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालात काय?
महिलेने १२ मुलांना जन्म दिला असून, तिचा दोन वेळेस गर्भपात झाला आहे. महिलेचा हेतू केवळ मुले जन्माला घालून विक्री करणे हाच होता. यात आईने आतापर्यंत सहा मुला-मुलींची विक्री केली आहे, असा अहवाल आरोग्य विभागाकडून समोर आला आहे.
एखाद्या महिलेला मुलं दत्तक द्यायचे असले तर कायद्यानुसार मोठी प्रक्रिया आहे. सदर महिलेला आपले मुलं दत्तक द्यायचे होते तर समाजातील लोकांशी किंवा नातेवाईकांशी चर्चा करायला हवी होती. किंवा पुढील मुले न होऊ देण्यासाठी ऑपरेशन करणे गरजेचे होते. आज या महिलेने मुलं विकले उद्या दुसऱ्या महिला देखील अशा करतील. त्यामुळे या महिलेने जर मुलं विकले असेल तर ही समाजाला काळीमा फासणारी घटना आहे.
हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी-त्र्यंबकेश्वर
पहिल्या महिन्यापासून तर नवव्या महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यासाठी सदर महिला रुग्णालयात जात नव्हती. तिला दररोज आरोग्य विभागाचे कर्मचारी सोनोग्राफीसाठी,रक्त तपासणी करण्यासाठी तुला रुग्णालयात जावे लागेल मात्र ती कुणाचेही ऐकत नव्हती. ही घटना आमच्या कार्यकर्त्यांना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली तेव्हा त्या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने तिची प्रसूती सुखरूप झाली. मात्र,प्रसूतीवेळी तिच्या घरचे कुणीही नातेवाईक आले नाहीत. त्यानंतर दोन महिन्यांनी या बाळाचे वजन घेण्यासाठी आशा सेविका तिच्या घरी गेल्या असता सदर महिलेकडे ते बाळ आढळून आले नाही. यावेळी त्या महिलेला आशा सेविकांनी बाळ कुठे आहे अशी विचारणा केली असता तिने आमची हलाखीची परिस्थिती असून, बाळ मोठे करण्याची ऐपत नसल्याने ते विकल्याचे सांगितले.
भगवान मधे, श्रमजीवी संघटना पदाधिकारी




