नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सोशल मीडियाचा (Social Media) गैरवापर करून नागरिकांमध्ये भीती व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा नाशिक सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याचा बनावट (मॉर्फ्ड) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून अफवा पसरवल्याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाविरोधात सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेशकुमार गिरीधारी रजक (वय २३ वर्ष, मूळ रा. जि. गिरीडीह, झारखंड; सध्या रा. डिसूझा कॉलनी, कॉलेज रोड, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.
सायबर पोलिसांच्या (Cyber Police) माहितीनुसार, ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ‘उज्जैन गँगस्टर महाकाल या नावाच्या एका इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून मूळ व्हिडिओंमध्ये फेरफार (छेडछाड) करून नाशिकमधील (Nashik) दोन महत्त्वाच्या ठिकाणी स्फोट झाल्याचे दाखवणारे बनावट व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराट आणि दहशतीचे वातावरण पसरवण्याच्या उद्देशाने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले गेले होते.
ही बाब सायबर पोलिसांच्या निदर्शनास येताच, पाेलिसांच्या फिर्यादीवरून १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २९२ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. संशयिताने (Suspected) हा व्हिडिओ स्वतः तयार केला की अन्य कुणाच्या सांगण्यावरून पोस्ट केला, यामागे काही कट आहे का, याचा शोध सायबर सेल घेत आहे.
संशयिताची पार्श्वभूमी
दिनेशकुमार हा मूळचा झारखंडचा असून तो रोजंदारीचे काम करतो आणि सध्या नाशिकमधील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कॉलेज रोड परिसरात भाडेतत्त्वाने वास्तव्यास आहे. नोंदवण्यात आलेल्या कलमांनुसार तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने, कायदेशीर नियमांनुसार २३ वर्षीय संशयिताला नोटीस बजावली आहे. सायबर पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत असून, तपासादरम्यान आवश्यकतेनुसार त्याला वेळोवेळी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
सोशल मीडियावर कोणतीही शहानिशा न करता अफवा पसरवणारे किंवा नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे व्हिडिओ, संदेश किंवा फोटो पोस्ट अथवा शेअर करू नयेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह आणि बनावट मजकुरावर पोलीस प्रशासनाची बारीक नजर असून, गैरप्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
-सुशीला काेल्हे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर




