नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा छळ करून तिचे अपहरण करत अश्लिल कृत्य केल्याची आणि या संपूर्ण कृत्याचे चित्रीकरण (व्हिडिओ शूटिंग) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) संशयित जीवन वाघ, दिगंबर ठाकरे, बाबजी खैरनार, लोकेश आणि इतर दोन अनोळखी मुले अशा एकूण सहा जणांविरुद्ध पोक्सोसह (POCSO Act) भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, संशयित जीवन वाघ याने इतर मित्रांच्या संगनमताने अल्पवयीन पीडितेशी तिची इच्छा नसताना मैत्री करण्यास भाग पाडले. ३० जून २०२६ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत संशयितांकडून पीडितेला वारंवार फोन करून त्रास दिला जात होता. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेच्या सुमारास पीडिता बाेरगडजवळीललतिच्या हॉस्टेलवर असताना सर्व संशयित हॉस्टेलच्या खाली आले.
त्यांनी पीडितेला धमकावून जबरदस्तीने गाडीत बसवले. यानंतर, मुख्य संशयित जीवन वाघ याने पीडितेच्या (Victim) इच्छेविरुद्ध अश्लील कृत्य केले. संतापजनक बाब म्हणजे, या कृत्यादरम्यान सोबत असलेल्या संशयित मित्रांपैकी एकाने संपूर्ण घटनेचे शूटिंग (व्हिडिओ रेकॉर्डिंग) केले. त्यानंतर पुढे एका ठिकाणी गाडी थांबवून जीवन वाघ याने पीडितेसोबत अधिक बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
शोधासाठी पथके रवाना
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. संशयितांच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले असून लवकरच बेड्या ठोकल्या जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.




