
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२६ च्या काळात आरोग्य व पॅरामेडिकल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासणार असल्याचा फायदा घेत, शासकीय भरती असल्याचे भासवून बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) तीन संशयितांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन रतन शिंदे (वय २९, रा. देवळा, जि. नाशिक) संस्था अध्यक्ष (व्यवसाय: ॲम्बुलन्स चालक), निलेश बबन घोलप (वय २२, रा. ओतूर, ता. कळवण) – संस्था सचिव (व्यवसाय: मेडिकल सर्व्हेअर), विक्रांत विजय सूर्यवंशी (वय ३०, रा. , तांबे मळा, पेठ रोड) – संस्था उपाध्यक्ष अशी संशयितांची (Suspected) नावे आहेत. त्यांनी हिलफोर्स फाऊंडेशन मल्टिसर्व्हिसेस या संस्थेच्या माध्यमातून बंपर कुंभमेळा भरती २०२६-२०२७ नावाने सोशल मीडियावर बनावट जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही जाहिरात थेट शासकीय किंवा आरोग्य विभागाचीच असल्याचा आभास निर्माण करून, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामद्वारे मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली.
या गुन्ह्यातील मुख्य संशयित हा रुग्णवाहिका चालक (ॲम्बुलन्स ड्रायव्हर) आहे. वैद्यकीय क्षेत्रातील दैनंदिन अनुभवातून त्याला आगामी सिंहस्थात (Simhastha) आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी असणार याची पूर्वकल्पना आली. याच संधीचा गैरफायदा घेण्यासाठी त्याने आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन ही संस्था स्थापन केली. पंचवटीतील आरटीओ ऑफिससमोरील एका हॉस्पिटलसमोर असलेल्या काॅम्प्लेक्समध्ये भाड्याने कार्यालय (Office) थाटून ही संस्था खासगी रुग्णालयांना पॅरामेडिकल मनुष्यबळ पुरवण्याचे काम करत होती. मात्र, कोणतीही शासकीय परवानगी नसताना, थेट ‘सिंहस्थ कुंभमेळा’ या नावाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी ही खोटी जाहिरात प्रसिद्ध केली, असे तपासात समाेर आले आहे.
संदर्भ सेवा रुग्णालयाची फिर्याद
ही खोटी जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच आरोग्य क्षेत्र खडबडून जागे झाले. याप्रकरणी संदर्भ सेवा रुग्णालयाचे डॉ. योगेश चित्ते (रा. चेतना नगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. २७ ऑगस्ट राेजी संशयितांवर माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाअन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील पवार अधिक तपास करत आहेत. सुदैवाने, या संशयितांच्या जाळ्यात अडकून अद्याप कोणत्याही उमेदवाराची प्रत्यक्ष आर्थिक फसवणूक झालेली नाही, असेही समाेर आले आहे.
पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचे आवाहन
सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कोणतीही भरती प्रक्रिया केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरून किंवा निविदेद्वारेच प्रसिद्ध केली जाते. अशा कोणत्याही सोशल मीडियावरील बनावट जाहिरातींना, व्हॉट्सॲप मेसेजला किंवा खासगी एजन्सींच्या आमिषाला बेरोजगारांनी बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




