नाशिक । प्रतिनिधी | Nashik
खासगी क्लासमधील बाकावर बसण्याच्या क्षुल्लक वादातून अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांमधील वाद (Student Dispute) रक्ताच्या थारोळ्यात रूपांतरित झाल्याची घटना विसे मळा परिसरातील ‘मालक चहा’ दुकानासमोर घडली हाेती. एबीएस क्लासेसमध्ये (ABS Classes) बसण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तीन ते चार संशयितांनी दोन दुचाकींवरून येत एका सहविद्यार्थ्यावर धारदार चाॅपरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर सरकारवाडा पोलिसांनी चौघांविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह आर्म ॲक्टचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांच्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास एका क्लासमधील दाेन विद्यार्थ्यांत बसण्याच्या जागेवरून बाचाबाची झाली होती. याचाच राग मनात धरून दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २९ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विसेमळा येथील ‘मालक चहा’ दुकानासमोर संशयित चाैघे विधिसंघर्षित एका साथीदारासह दोन दुचाकींवर आले. त्यांनी या विद्यार्थ्यासह मित्रांना गाठून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. तर रस्त्यावरील दगड आणि सिमेंटचे गट्टू फेकून मारले.
यादरम्यान, एका विधिसंघर्षित मुलाने कमरेला खोचलेला चॉपर काढून जीवघेणा वार केला. तेव्हा या विद्यार्थ्याने वेळेत मागे सरकून वार चुकवल्याने अनर्थ टळला. वर्षभरापूर्वी सातपूर येथे एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा वर्गमित्रांनीच खून (Murder) केल्याची घटना ताजी असतानाच, कॉलेज रोडसारख्या उच्चभ्रू शिक्षण परिसरात घडलेल्या या घटनेने पालकांसह पाेलिसांची शिक्षण विभागाची झोप उडवली आहे. दरम्यान, या विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
अल्पवयीन’च्या आडोशामागे तरुण गुन्हेगारीचे रूप
कायद्यानुसार १५ ते १७ वयोगटातील विधिसंघर्षित मुले शरीरयष्टीने आणि फॅशनेबल ट्रेंडमुळे १८ ते २५ वयोगटातील प्रौढांसारखे दिसतात. यामुळे अल्पवयीन असण्याचा गैरफायदा घेत गुन्हेगारीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. नामांकित स्कूल आणि प्रायव्हेट कोचिंग क्लासेसच्या परिसरात असलेले चहा, सिगारेटच्या टपऱ्या भांडणांचे आणि कट-कारस्थानांचे अड्डे बनत चालले आहेत. अवघ्या १६-१७ वर्षांचे विद्यार्थी सामान्य दिवसातही कपड्यांमध्ये धारदार ‘चॉपर’सारखी प्राणघातक शस्त्रे बाळगून फिरतात, ही धोक्याची घंटा आहे.
मुद्दे
बाकावरून वाद; चॉपरने वार
व्हायरल व्हिडिओने गुन्हा उघड
चौघांवर ‘बीएनएस’ अन् आर्म ॲक्ट
अल्पवयीन गुन्हेगारीचा वाढता आलेख
सज्ञान भासणारी ‘बाल’गुन्हेगारी
शस्त्र संस्कृतीचे घातक वळण
पालक-प्रशासकीय चिंतेत वाढ



