नाशिक | प्रतिनिधी | Nashik
इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) मौज गिरणारे (बनवाडी) येथील वन्यजीव शिकार प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत आहे. संशयितांनी (Suspected) शिकारीसाठी बंदूक वापरल्याची माहिती उघड होत असून झडतीदरम्यान ही बंदूक अद्याप हस्तगत झालेली नाही. आता संशयितांचे सीडीआर आणि लाईव्ह लोकेशन मिळताच या शिकारी टोळीचा मुख्य हेतू आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा उलगडा होणार आहे.
इगतपुरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने या प्रकरणात आतापर्यंत तिघा संशयितांची कसून चौकशी केली आहे. मात्र त्यातून आवश्यक माहिती व पुरावे मिळाले नसून चार जणांच्या या टोळीने वन्यजीवांची हत्या करून अंधश्रद्धेपोटी अघोरी कृत्यांसाठी प्राण्यांच्या अवयवांची काही हजारांत विक्री केल्याचा संशय वनखात्यास आहे. या टोळीने आतापर्यंत किती आणि कोणत्या वन्यजीवांची शिकार केली, तसेच हे अवयव नेमके कुठे आणि कोणाला विकले, याचा तपास प्राधान्याने केला जाणार आहे.
अंधश्रद्धेचा विळखा की तस्करी?
आठ मे रोजी माळी याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काळवीट, सांबराचे शिंग, रानडुकराचे दात आणि दुर्मिळ घुबडाचे अवयव जप्त करण्यात आले होते. प्राथमिक चौकशीत हे अवयव ‘धार्मिक’ कार्यासाठी असल्याचे सांगण्यात आले असले, तरी यामागे मोठी आर्थिक उलाढाल आणि संघटित शिकार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पसार साथीदार?
संशयित शिकारी माळी याला सोमवारी (दि. ११) पुन्हा न्यायालयात (Court) हजर केले जाणार असून, त्या गायब बंदुकीचा शोध वनविभाग घेत आहे. या बंदुकीचा विल्हेवाट कुणी व कुठे लावली याची माहिती घेतली जात असून, प्रकरणातील काही संशयित पसार असण्याचा संशय आहे. तांत्रिक माहिती हाती येताच या तपासाला गती मिळणार असून, इगतपुरी वनविभागाच्या हाती वन्यजीवांची हत्या व तस्करीचे रॅकेट लागण्याची दाट शक्यता आहे. या संपूर्ण तपासावर आरएफओ कांचन भुसाळ स्वतः वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत.
सीडीआर व तांत्रिक तपासानंतरच इतर संशयितांचा सहभाग आहे का हे समोर येईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. तपासासाठी विशेष टीम कार्यरत आहे.
कांचन भुसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी





