नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आर्थिक वादातून दोन गट प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यात (Police Station) पोहोचले असता त्यांच्यात अचानक तुफान राडा (Clashes) घडल्याची घटना मंगळवारी (दि.१९) दुपारी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) अवारात घडली. याबाबत पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होत दोन्ही गटांतील तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पितांबर नानाभाऊ घरटे (५९, रा. सुरभी, जुईनगर, दिंडोरीरोड, नाशिक), प्रकाश वसंत बोऱ्हाडे (५०, रा. जेऊर पाटोदा, कोपरगाव, जि. अहिल्यानगर) व विनोद प्रकाश पारसकर (३७, रा. उमयादीप, कलानगर, नाशिक) अशी संशयितांची (Suspected) नावे आहेत. प्रकाश बो-हाडे व विनोद पारस्कर यांनी घरटे यांच्या आजीकडून काही वर्षांपूर्वी दोन लाख रुपये हात उसनवार मिळवले होते.
यासंदर्भात म्हसरूळ पोलिसांत तक्रार अर्ज दाखल होता. त्यानुसार तपास अधिकारी व पोलीस हवालदार चव्हाण यांनी दोन्ही गटांना मंगळवारी दुपारी बारा वाजता पोलीस ठाण्यात बोलावून समझोता घडवून आणला. हा समझोता घडत असताना तिघे संशयित पोलीस (Police) ठाण्यातून बाहेर गेले.
यानंतर त्यांच्यात आर्थिक प्रकरणातून वाद झाला. त्यानंतर तिघे एकमेकांवर धावले. अशातच तिघे पुन्हा पोलीस ठाणे आवारात आले व त्यांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहून पोलीस ठाण्यात अशांतता निर्माण केली. यावरच न थांबता तिघे पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षात शिरले व तेथेही प्रचंड शिवीगाळ करून एकमेकांवर चाल केली. या प्रकाराने पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला.
दरम्यान, यावेळी उपस्थित पोलिसांनी तिघांची हाणामारी सोडवली. तरीही तिघे एकमेकांना जुमानत नसल्याने पोलिसांनी आवाज वाढवला. त्यानंतर तिघे शांत झाले. अखेर पोलीस ठाण्यातच राडा घातल्याप्रकरणी अंमलदार रोहन मरसाळे यांनी फिर्याद नोंदवली. त्यानुसार, तिघांवर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार खराटे करत आहेत. संशयितांना नोटीस देण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
हा आहे वाद
घरटे यांच्या आजीने काही वर्षांपूर्वी वरील दोघांना दोन लाख रुपये दिले होते, असा दावा तक्रार अर्जात आहे. त्यानुसार ‘माझ्या आजीने दिलेले पैसे परत द्या’ असे घरटे यांचे म्हणणे होते. मात्र दोघांनी दोन लाख रुपये तेव्हाच परत केल्याचे व जसे पैसे मिळत गेले, तसे आजीकडे परतफेड केल्याचे सांगिले. याच वादातून फ्लॅटवरील कर्ज थकले व बँकेने त्याचा लिलाव केला. त्यामुळे घरटे यांनी आक्षेप घेत तक्रार नोंदवली होती.





