नाशिक | प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांची चेकिंग करण्यासह टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत तब्बल ५० टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वात नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या ५५ तडीपार गुन्हेगारांची चेकिंग करण्यात आली. तर उपनगर व नाशिकरोड हद्दीतून तडीपार गुंड राहूल ऊर्फ पप्या बाबूलाल चाफळकर, गौरव ऊर्फ सोनू सुभाष भागवत हे दोघे तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून मिळून आल्याने दोघांना अटक करण्यात आली. तर रेकॉर्डवरील ११८ गुन्हेगारांची चेकिंग करण्यात आली. अंबड हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार रोशन सुभाष मुर्तडक (२१) यास पेलिकन पार्क येथून कोयत्यासह अटक केली.
हे ही वाचा: Nashik News: आरोग्यसेवत नाशिक जिल्हा रुग्णालय अव्वल; उपचार घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक
तर नाशिकरोडच्या मालधक्का गेटजवळ अवैधरीत्या देशी दारुविक्री करताना संशयित गणेश गायकवाड यास ताब्यात घेत देशी दारूचा अवैध साठा जप्त करण्यात आला. तर चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत सुरेश पवार यास देशी दारूच्या साठ्यासह ताब्यात घेण्यात आले. झोन दोनमध्ये कोम्बिंग करताना पोलिसांनी ५० टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. कारवाईत राऊत यांच्यासह नाशिकरोड विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, अंबड विभागाचे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथके सहभागी होते.