पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील (Mhasrul Police Station Area) मानेनगर परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यावसन कायदेशीर संघर्षात झाले आहे. या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि खंडणीसारखे गंभीर आरोप केले असून, म्हसरूळ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील (Case) पहिल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार महिला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेल्या असता, जुन्या वादाची कुरापत काढून त्यांना आणि त्यांच्या मुलीला अडवण्यात आले. यावेळी संशयित नगरसेविकेचा पती, मुलगा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी त्यांना मारहाण करत विनयभंग केला व त्यांचा मोबाईल फोडून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.
दुसऱ्या बाजूने ७० वर्षीय वृद्ध महिलेने (नगरसेविकेच्या सासू) दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित (Suspected) महिला व तिच्या मुलांनी त्यांच्या नातवाला धमकी दिली. या वादाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यात आली. तक्रारदार महिला घरी एकट्या असताना संशयितांनी त्यांना गाठून अमानवीय मारहाण केली. तसेच दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत, पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि विनयभंग केला, असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच दोन्ही गटांच्या समर्थकांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पोलीस ठाण्यातच (Police Station) ‘हायव्होल्टेज’ ड्रामा पहायला मिळाला.दोन्ही गटांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्णपणे पुराव्यांच्या आधारे केला जाईल,”असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. संवैधानिक तत्त्वानुसार, दोन्ही बाजूंच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी सुरू असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात सामाजिक शांतता बाधित होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क आहेत.





