नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांना व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आणि मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadlag) तसेच वसंत कचरु मुर्तडक यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. जिल्हा न्यायालयात मंगळवारी (दि. ९) त्यांच्या जामीन अर्जावर सातव्यांदा सुनावणी झाली, परंतु ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची आठवी सुनावणी येत्या गुरुवारी, ११ जून रोजी होणार आहे.
त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ९) जिल्हा न्यायालयात या दोन्ही संशयितांच्या जामीन अर्जावर सुनावणी निश्चित होती. मात्र, संशयितांच्या वकिलांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडे काही कारणास्तव वेळ मागत सुनावणीची तारीख वाढवून देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने आता पुढील सुनावणी ११ जून रोजी होणार आहे. सातत्याने लांबणीवर पडणाऱ्या सुनावणीमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह भाविकांचे लक्ष लागले आहे. व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. अनेकदा लूट होऊनही भाविक पोलिसात तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे त्र्यंबक पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे मंदिर परिसरात एक ‘स्टिंग ऑपरेशन’ राबवले.
दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी (Police) थेट मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, त्यांचे पुतणे ओम व अभिषेक कडलग आणि एजंट गोटीराम पेहरे यांच्यासह अन्य दोघांना पकडून त्यांचा पर्दाफाश केला हाेता. याप्रकरणी ११ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर १४ एप्रिल रोजी पोलिसांनी कडलग व इतर संशयितांना अटक केली हाेती. गेल्या दोन महिन्यांपासून पुरुषोत्तम कडलग आणि त्याचे साथीदार नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आता ११ जून रोजी होणाऱ्या आठव्या सुनावणीत त्यांना जामीन मिळतो की त्यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.




