नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्याची भीती दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोककुमार खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन’च्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. संशयिताचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि पीडितांसह समाजाचा न्याय मिळवण्याचा अधिकार यामध्ये समतोल साधणे अत्यंत आवश्यक असून, अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात जामीन देणे पूर्णपणे अयोग्य ठरेल, असे स्पष्ट व महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) खरातचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे भोंदूची इतर गुन्ह्यांमधील जामिनाची शक्यताही धूसर झाली आहे.
नाशिक सत्र न्यायालयाचे अपर सत्र न्यायाधीश नंदकिशोर एल. मोरे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यातील (Sarkarwada Police Station) गुन्हा क्रमांक ७७ मध्ये हा जामीन अर्ज फेटाळला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केला, तर बचाव पक्षातर्फे ॲड. राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यात खरात २९ एप्रिलपासून कोठडीत असून जामीन अर्जाच्या सुनावणीपर्यंत ५ महिने ४ दिवस अशी त्याची कोठडी पूर्ण झाली आहे. या खटल्यात दोषारोपपत्र दाखल असून प्रकरण आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहे. दोषारोपपत्रात २० साक्षीदार नमूद आहेत.
लष्करातील (Army) माजी सैनिक असलेला अशोक खरात निवृत्तीनंतर ज्योतिष व अंकशास्त्राचा व्यवसाय करत स्वतःला देवाचा अवतार मानत हाेता. याच प्रभावाचा गैरवापर करत त्याने अनेक महिलांचे मानसिक व लैंगिक शोषण केले. असाच एक गंभीर प्रकार ७ ते १२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला हाेता. एका बँकेत व्यवस्थापक असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीला खरातने आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. पतीला बाहेर थांबवून, पीडितेच्या कानात मंत्र उच्चारणे, अयोग्य स्पर्श करणे आणि हातावर जादूटोण्याचा दगड फिरवून लैंगिक शोषणाचा प्रयत्न खरातने केला. खरातच्या राजकीय व सामाजिक प्रभावामुळे सुरुवातीला घाबरलेल्या पीडितेने मार्च २०२६ मध्ये इतर पीडित महिलांच्या तक्रारींनंतर धैर्याने पुढे येत पोलिसांत फिर्याद दिली हाेती.
युक्तिवाद व न्यायालयाचे निरीक्षण
बचाव पक्षाने अटकेची कारणे न देणे, ५ महिन्यांपेक्षा जास्त कोठडी होणे आणि शिक्षेच्या कालावधीचा संदर्भ देत जामिनाची मागणी केली होती. मात्र, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे दावे खोडून काढले. खरातच्या कृत्याचे व्हिडिओ फूटेज उपलब्ध असून ते पीडितेच्या कथनाला थेट बळ देते. बीएनएसएसनुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच दस्तऐवज न्यायालयात सादर केले आहेत. स्वतःच्या तथाकथित बाबा असण्याच्या प्रभावाचा गैरवापर करून अनेक महिलांचे त्याने सातत्याने शोषण केले आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भोंदूचा जामीन फेटाळला.
मुद्दे
- खरातविरुद्ध नाशिक, नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर पोलिसांत १७ गुन्हे नोंद
– मुंबईच्या विशेष न्यायालयात ईडीमार्फत स्वतंत्र खटला
– नाशिक सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३, ७५ ते ७९, ८१, ८३, ८५, ८७ व ९५ असे आठ गुन्हे
– सिन्नर पोलिसांत गुन्हा क्रमांक २१३, २२५ व २९४ असे तीन गुन्हे
– राहता पोलिसांत गुन्हा क्रमांक १२१ नोंद
– श्रीरामपूर पोलिसांत गुन्हा क्रमांक २३९ नोंद




