Friday, May 15, 2026
Homeक्राईमNashik Crime News : मुलींच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत अत्याचार; नराधमाला न्यायालयाने ठोठावली...

Nashik Crime News : मुलींच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत अत्याचार; नराधमाला न्यायालयाने ठोठावली मरेपर्यंत जन्मठेप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अल्पवयीन मुलींना त्यांचे बाहेर प्रेमसंबंध असल्याची भीती घालून, त्यांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत अत्याचार करणाऱ्या नराधमास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik District and Seassion Court) मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा (Imprisonment) सुनावली आहे. चंदर दौलत गांगोडे (वय ३५, रा. डांगराळे, ता. सुरगाणा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील दोन्ही पीडित मुली दहावी आणि आठवीत शिकत होत्या.

- Advertisement -

आरोपी चंदर याने २०२१ च्या दिवाळीपासून या दोन्ही मुलींवर (Girls) वक्रदृष्टी ठेवली. तुमचे दुसऱ्या मुलांसोबत संबंध आहेत, ते मी तुमच्या घरच्यांना सांगेन अशी धमकी देऊन त्याने त्यांना वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर दोन्ही पीडित मुलींनी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पळून जात असताना एका मुलाने त्यांना हटकले आणि विचारपूस केली असता, सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या न्यायालयात पार पडली.

सरकारी पक्षातर्फे अॅड. भानुप्रिया नितीन पेठकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने चंदर गांगोडे याला पोक्सो कलम सहा अन्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद आणि दोन्ही पीडितांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्याचा तपास सुरगाणा पोलीस ठाण्याचे (Surgana Police Station) तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बोडखे यांनी केला होता. दोषसिद्धीसाठी पैरवी अंमलदार वैशाली भोर, विजय बेनके, श्रीकांत पाटील व अश्विनी परदेशी यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या