नाशिक | प्रतिनिधी
एका बनावट न्यायाधिशाने बोगस न्यायालय सुरु करत अनेक न्यायनिवाडे केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता चक्क सायबर व सीबीआय पोलिसांची वर्दी धारण करणाऱ्या सायबर चोरट्यांनी नाशिकमधील एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवकास मनीलॉन्ड्रिंगच्या आरोपात ओढून तेवीस लाख रुपये उकळले आहेत. शहरात अशा स्वरुपाची ही दहावी घटना असून एकाही गुन्ह्यात संशयितांना पकडण्यात अपयश आले आहे. त्याखेरीज सायबर पोलिसांत ऑनलाईन फ्रॉडचे शंभर गुन्हे नोंदविण्याव्यतिरिक्त तपास मात्र, कागदं रंगविण्यासह शून्यावरच आडून आहे.
शहरातील एका ४५ वर्षीय आरोग्यसेवकास सायबर चोरट्यांनी ३० ऑक्टोबर रोजी व्हॉटस्अॅप, टेलिग्राम व स्काईपी या सोशल मीडिया माध्यमांवरुन अचानक संपर्क साधला. या संपर्कादरम्यान, चोरट्यांनी व्हिडीओ कॉलवरुन पोलीस अधिकाऱ्याची वर्दी आणि पोलीस ठाणे दिसेल, अशी व्यवस्था करत ९१९७८५१३४६११ व Skype id live .cid. 54bc1d34d7f5da97 चा वापर करुन ‘मी प्रदीप सावंत, अंधेरी सायबर सेलमधून बोलत आहे’, असे सांगितले. त्यानंतर बोगस पोलीस अधिकारी पद धारण केलेल्या सावंत याने आरोग्यसेवकास एका तपासादरम्यान, तुमचे आधार कार्ड हे मनी लाँड्रींग व ड्रग्ज तस्करीच्या संशयास्पद व्यवहारात आढळले आहे. त्यामुळे तुम्हाला अटक होईल. न्यायालयाकडूनही कामकाज सुरु आहे, असे सांगितले. जर यातून सुटका करून घ्यायची असेल तर तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा असलेले पैसे ‘फंड व्हेरिफिरेशन’ करुन आम्ही सांगितल्यानुसार विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करा, असे सांगितले. आरोग्य सेवकास ही बाब ऐकून धक्का बसल्याने त्याने सुटका करुन घेण्यासाठी संशयितांच्या सांगण्यानुसार २३ लाख ५० हजार रुपये विविध बँक खात्यांत ट्रान्स्फर केले. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्याने गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे धाव घेत आपबिती कथन केली. त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. अशा फसवणुका टाळण्यासाठी किंवा काहीही शंका, समाधासाठी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा तसेच आपात्कालिन स्थितीत सायबर हेल्पलाईन नंबर- १९३० वर कॉल करावा.
ओरिजनल पोलीसही फ्रॉडचे बळी
सायबर चोरट्यांनी तरुण तुर्क नोकरदारांपासून दररोज कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल करणाऱ्या प्रतिथयश उद्योजकांना व काही लष्करी अधिकारी, राज्य व केंद्र शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. प्रतिष्ठेला डाग नको म्हणूण अनेक तक्रारदार पोलिसांकडे तक्रारही करत नाहीत. काही प्रकरणात तर ‘ओरिजनल’ पोलीस अधिकाऱ्यांनाही गंडा घालण्यात आला आहे. तरी देखिल सायबर चोरट्यांचे फायनल नेटवर्क शोधण्यात टीएडब्लूसह सायबर पोलिसांना अपयश येत आहे. विशेष म्हणजे सायबर फसवणुकीसंदर्भात केवळ गुन्हे नोंदविले जात असून तपासासाठी प्रत्यक्ष फिल्डवर जाण्यास कोणताही वरिष्ठ अधिकारी नाशिकबाहेर जाण्यास तयार नाही, हे देखील समोर येत आहे.
दोन निरीक्षक, पण…
जानेवारीपासून १८ डिसेंबर २०२४ पर्यंत शहर सायबर पोलीस ठाण्यात सायबर फसणूक, गंडा व अन्य स्वरुपात तब्बल १०० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल असले तरी त्यांचा तपास अतिशय कासवगतीने आहे. केवळ बोटावर मोजण्याइतक्याच प्रकरणात सायबर पोलिसांना लीड मिळाले आहेत. तिथेपासून पुढे तपास करण्यात वाव मिळत नसल्याचे समजते. विशेष म्हणजे सायबर पोलीस ठाण्याला एक नव्हेतर दोन स्वतंत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्यरत असूनही एकाही मेजर गुन्ह्याचा तपास पूर्णत्वास गेलेला नाही. याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे. याशिवाय तत्कालिन अधिकारी तपासासाठी नोएडा तसेच अन्य राज्यात जात होते.