नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुलाचा संसार सुखाचा व्हावा आणि सुनेलाही परदेशात चांगली संधी मिळावी, या उद्देशाने सासू-साऱ्यांनी आयुष्यभराची जमापुंजी पणाला लावली. मात्र, ज्या सुनेवर डोळे झाकून विश्वास ठेवला, तिनेच वडिलांच्या साथीने सासरच्यांना तब्बल तीन लाख ८२ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार नाशिकच्या चांदशी भागात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सासू रेखा पाटील (वय ५६) यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) सून आणि तिच्या वडिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांच्या (Police) माहितीनुसार, रेखा पाटील यांचे पती खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा लहान मुलगा दिव्यांग आहे. त्यांचा मोठा मुलगा कुणाल हा २०१९ पासून कॅनडा येथे नोकरीला आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये कुणालचा विवाह प्रियंका हेमंत जाधव हिच्याशी झाला. प्रियंकालाही पतीसोबत कॅनडाला जाता यावे, म्हणून कायदेशीर सोपस्कार तातडीने पूर्ण करण्यात आले. जानेवारी २०२४ मध्ये बँक खात्यात पुरेशी रक्कम (फंड्स) नसल्याने प्रियंकाचा कॅनडाचा व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यानंतर प्रियंका आणि तिचे वडील हेमंत शिवाजी जाधव यांनी पाटील कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. आपल्या मुला-सुनेचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून रेखा पाटील यांनी स्वतःची १ लाख ८० हजार आणि त्यांच्या पतीने १ लाख ७० हजारांची मुदत ठेव (FD) मोडून, इतर पैशांसह एकूण ३ लाख ८२ हजार रुपये प्रियंकाच्या बँक खात्यात जमा केले.
व्हिसा आल्यानंतर किंवा कॅनडाला गेल्यावर हे पैसे परत करण्याचे आश्वासन प्रियंकाने दिले होते. पैसे खात्यात जमा झाल्यानंतर जून २०२४ मध्ये प्रियंकाचा व्हिसा मंजूर झाल्याचा ई-मेल आला. मात्र, उद्दिष्ट साध्य होताच प्रियंकाने खरा चेहरा दाखवला. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२४ दरम्यान, सासरच्या मंडळींना कोणतीही कल्पना न देता तिने आपल्या वडिलांना बोलावून घेतले. घरातील सर्व दागिने आणि कपडे घेऊन ती माहेरी निघून गेली. त्यानंतर पतीने कॅनडाहून आणि सासरच्यांनी नाशिकहून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने पतीसोबत राहण्यास आणि कॅनडाला जाण्यास स्पष्ट नकार दिला. पाटील कुटुंबीयांनी (Family) व्हिसासाठी दिलेले पैसे परत मागितले असता, “तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, पैसे मिळणार नाहीत” अशी धमकी दोन्ही संशयितांनी दिली. अखेर फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.
सायबर चोरांचा सुळसुळाट
एकीकडे कौटुंबिक फसवणुकीची घटना ताजी असतानाच, नाशिक शहरात सायबर भामट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या दोन्ही प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पाथर्डी फाटा परिसरातील हनुमाननगर येथील ‘संस्कार हाईट्स’मध्ये राहणारे गोरख दिगंबर गारे (वय ४२, रा. खाजगी नोकरी) यांना एका सायबर भामट्याने टार्गेट केले. २७ जून ते १ जुलै २०२६ दरम्यान, संशयिताने ‘एमएनजीएल’ (MNGL) गॅस कनेक्शनचे प्रलंबित बिल भरण्याचा बहाणा करून गारे यांच्याशी संपर्क साधला. गारे यांच्या मोबाईलचा गैरवापर करत भामट्याने त्यांचे बँकेचे क्रेडिट कार्ड सक्रिय करून घेतले आणि त्यावरून तब्बल २ लाख ४८ हजार २२१ रुपये परस्पर लांबवले.
’ईपीएफओ’ च्या नावाखाली फसवणूक
दुसऱ्या घटनेत, ७५ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक श्रीपाद वासुदेव काळेले यांना सायबर चोरांनी आपल्या जाळ्यात ओढले. ९ ते ११ जून २०२६ दरम्यान, एका अज्ञाताने काळेले यांना फोन करून ‘ईपीएफओ’चे (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) अडकलेले पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन करून, ‘प्रोसीजर फी’ आणि ‘प्रोसेसिंग चार्जेस’च्या नावाखाली ९४ हजार ८२८ रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच काळेले यांनी पोलिसांत तक्रार दिली.




