Monday, October 5, 2026
Homeक्राईमNashik Crime News : देवळा पोलिसांची मोठी कारवाई; ६ लाखांचा अवैध तंबाखू...

Nashik Crime News : देवळा पोलिसांची मोठी कारवाई; ६ लाखांचा अवैध तंबाखू अन् गुटखा जप्त, गुन्हा दाखल

देवळा | वार्ताहर | Deola

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात उत्पादित, साठवणूक व विक्रीस बंदी असलेला अवैध सुगंधित पानमसाला, जर्दा व गुटख्याविरोधात देवळा पोलीस ठाणे (Deola Police Station) आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पिंपळगाव (वाघुल) शिवारात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी वाहनासह एकूण ६ लाख ३७ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदी असलेला सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची आणि वाहतूक (Trafic) केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ०४ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव (वाघुल) येथील साहिल जब्बार तांबोळी (वय २३) याच्या शेतातील घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना १ लाख ८७ हजार ५६० रुपये किमतीचा अवैध सुगंधित तंबाखू (जर्दा), पानमसाला व गुटख्याचा साठा आढळून आला. तसेच या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे पॅक बॉडी वाहन (क्र. MA-12/QW-3100) असे एकूण ६ लाख ३७ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला.

दरम्यान, ही कारवाई देवळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पवार, शरीफ शेख आणि दिलीप सोनवणे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती नंदा पाटील करत आहेत. बेकायदेशीर गुटखा व तंबाखू तस्करांविरोधात पोलिसांनी उगारलेल्या या बडग्यामुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला मिळतोय हा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 375 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 3963 क्रेटस् ची...