नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आजारपण अन् कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून धुळ्यातील (Dhule) एका अल्पभूधारक मजुराच्या कुटुंबाची नाशिकमध्ये अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल एक लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या (Nashik) प्रसिद्ध गंगाघाटावरील केवडीबन येथे पीडित महिलेला अघोरी स्नान घालून, डोळ्यात लिंबाचा रस पिळून भोंदूगिरी करण्यात आली. एवढेच नव्हे तर २१ वर्षांच्या तरुण मुलीवर जादूटोण्याची भीती दाखवून तिचा जबरदस्तीने स्वतःच्या मुलाशी साखरपुडा घडवून आणला. याप्रकरणी धुळे शहर पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) मदतीने संशयित मांत्रिक महिलेसह तिच्या साथीदारांना नाशिकमधून बेड्या ठोकल्या आहेत.
सरिता मनोज जाधव (रा. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित भोंदू मांत्रिक महिलेचे (Bhondu Women) नाव असून, तिचा मुलगा गणेश मनोज जाधव व अन्य साथीदारांवर जादूटोणाविरोधी कायद्यासह विविध कलमांन्वये धुळे शहर पोलिटीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांच्या व अंनिसच्या माहितीनुसार, धुळे येथील पीडित महिला मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकते. सततच्या आजारपणामुळे त्या आर्थिक अडचणीत होत्या. त्यांच्या दोन मैत्रिणींनी नाशिकहून धुळ्यात आलेल्या सरिता जाधव या मांत्रिक महिलेशी त्यांची ओळख करून दिली. मांत्रिकेने पीडितेच्या अंगावरून लिंबू फिरवून ते पाण्यात पिळले व त्यात राख टाकून ते पिण्यास दिले.
अंगात आल्याचा बनाव करत, माझे वचन पाळले नाही तर वाईट होईल, अशी भीती घातली. पीडितेच्या डोक्याचे केस उपटून स्मशानात पूजा करावी लागेल, असे सांगत ११ अमावस्या व १० पौर्णिमेला नाशिकला येऊन उतारे करण्याचे सांगून १ लाख ५१ हजार रुपयांची मागणी केली. पीडितेने सुरुवातीला १ लाख ३० हजार रुपये रोख दिले. यानंतर १४ जुलै २०२६ रोजी अमावस्येच्या मुहूर्तावर मांत्रिकेने पीडितेला नाशिकला बोलावून घेतले. पंचवटीतील केवडीबन भागात पीडितेला स्नान घालण्यात आले. तिच्या अंगावरून उतरवलेल्या लिंबाचा रस थेट तिच्या डोळ्यात पिळला. तसेच अंगावरील वस्त्रे नदीत फेकून नवीन कपडे घालण्यास भाग पाडले. त्यानंतर खोबरे व पेढा खायला दिल्याने पीडितेला मळमळ व उल्टी झाली. एवढ्यावरच न थांबता, मांत्रिकेने पीडितेला मुंबई नाका (Mumbai Naka) येथील राहत्या घरी नेऊन तेथे काळे तीळ अन् राखेच्या साह्याने पुन्हा अघोरी पूजा केली व आणखी ३० हजार रुपये उकळले.
मुलीला डांबून जबरदस्तीने साखरपुडा
पीडितेच्या २१ वर्षांच्या मुलीवर दुष्ट शक्तींचा प्रभाव असल्याचे सांगून मांत्रिकेने तिला धुळ्यातील मैत्रिणीच्या घरी ४० दिवस ठेवण्यास भाग पाडले. मुलीचे माझ्या मुलाशी लग्न लावून दिले तरच तुमचे संकट टळेल, अशी भीती घातली. मुलीचे ब्रेनवॉश करून तिला कुटुंबापासून दूर ठेवले आणि २४ जुलै २०२६ रोजी मांत्रिकेने तिचा मुलगा गणेश जाधव याच्याशी मुलीचा जबरदस्तीने साखरपुडा उरकून घेतला. त्यानंतर संशयितांनी पीडित कुटुंबाशी संपर्क तोडला.
अंनिसच्या धैर्यामुळे पोलिसांत धाव
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी (अंनिस) संपर्क साधला. अंनिसचे कार्यकर्ते रणजित शिंदे, नवल ठाकरे, भूषण पाटील व नितीन बागुल यांनी पीडित कुटुंबाला धीर देत पोलिसांत जाण्याचे धैर्य दिले. त्यानंतर २७ सप्टेंबर २०२६ रोजी धुळे शहर पोलिस ठाण्यात अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच धुळे शहर पोलिस ठाण्याचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिक पोलिसांच्या मदतीने शोध घेऊन संशयित मांत्रिक महिला सरिता जाधव आणि तिच्या साथीदारांना नाशिकमधून मुसक्या आवळण्यात आल्या.




