नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहराचा (Nashik City) झपाट्याने होणारा विस्तार आणि बदलती जीवनशैली यासोबतच रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन (‘ओपन बार’) करण्याचे प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारे वाद ही शहरासमोरील गंभीर समस्या बनत चालली आहे. मध्यरात्री रस्त्यांवर होणारी हुल्लडबाजी आणि मद्यधुंद अवस्थेतील वाहनांचे वाढते प्रमाण यामुळे नागरिक आणि पोलीस प्रशासन (Citizen and Police) यांच्यात समन्वय व अधिक प्रभावी कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.
२०२५ च्या सुरुवातीला गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीतील एका ‘रूफटॉप’ हॉटेलमधील घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व ‘ओपन बार’ आणि अनधिकृत हुक्का पार्लर बंद करण्याचे, तसेच हॉटेल्सना वेळेचे बंधन पाळण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सुरुवातीला पोलिसांनी धडक मोहीम राबवून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
मात्र, काही महिन्यांच्या शांततेनंतर आता पुन्हा वेगवेगळ्या भागांत मद्यपींकडून सार्वजनिक शांतता धोक्यात आणल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. प्रशासनाकडून ‘स्टॉप अँड सर्च’, निर्भया पथके आणि रात्रीची गस्त नियमित सुरू असली, तरी शहराच्या सुरक्षेसाठी यंत्रणेवर पडणारा ताण आणि वाढती टवाळखोरी रोखणे हे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे. शहरातील बहुतांश ‘वाइन शॉप बाहेर रात्री आठ ते दहा या वेळेत मद्यपींची ‘जत्रा’ भरते.
महात्मानगर, त्र्यंबक नाकासह इतर भागातील काही मद्य दुकानांशेजारी मद्यपींना बसण्यासाठी ‘विशेष सोय’ आहे. त्यासाठी प्रत्येक बाटलीमागे दहा-वीस रुपये आकारले जातात. महात्मानगरातील एका पेट्रोल पंपाच्या आवारात असलेल्या वाइन शॉपमध्येच लहानशा जागेत मद्यपींना जागा उपलब्ध आहे, रात्री उशिराने दारूच्या नशेत अल्पवयीन मुले रस्त्याने आरडाओरड करत असून गल्लीबोळांत मद्यपींचे राडे होत असल्याचे प्रकार रस्तोरस्ती घडत आहेत. पोलिसांनी (Police) वेळीच त्याला रोख लावण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
शरणपूर रस्ता
येथील काही वाइन शॉपच्या परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढले असून, सार्वजनिक बस थांब्यांचा गैरवापर होतो आहे. महापालिकेशेजारी व पाठीमागील जागेत रात्रीच्या वेळी गर्दी होत आहे. येथे गांजा ओढणाऱ्यांची जत्रा भरते.
महात्मानगर व कॉलेज रोड
या व्यावसायिक ठिकाणी वाइन शॉप्स आणि कॅफेबाहेर होणारी वाहनांची गर्दी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. काही ठिकाणी व्यावसायिक हितासाठी ग्राहकांना अनधिकृत जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचेही समोर आले आहे. कॉलेज रोडवरील पोलीस चौकीच्या परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या वाढली आहे.
वीकेंडला वाढणारा ताण
शनिवार आणि रविवारी शहराबाहेरील हॉटेल्समधून मद्यप्राशन करून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. पथदीप नसलेल्या अंधाऱ्या स्त्यांचा गैरफायदा घेऊन उघड्यावर पायां करण्याचे प्रमाण वाढले आहे.
उपाययोजनांची गरज
सायरन वाजवून गस्त घालणे हे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य असले, तरी प्रत्यक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अधिक ठोस कायदेशीर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत. दुसरीकडे, व्यावसायिकांनी नियमांचे पालन करणे, रात्रीच्या वेळी महापालिकेने पुरेशी प्रकाशव्यवस्था (पथदीप) कार्यान्वित ठेवणे आणि नागरिकांनीही सार्वजनिक शिस्तीचे भान राखणे तितकेच गरजेचे आहे.
…या आदेशांचे काय ?
- हॉटेल, बारमध्ये नियोजित जागेपेक्षा इतरत्र टेबल टाकून दारू विक्री होत असल्यास गुन्हे नोंदवा.
- रस्त्यावर दारू पिणारे, हुल्लडबाजी करणारे, टवाळखोरी करणाऱ्यांना ताब्यात घ्या.
- शहरातले सगळे बार नियोजित वेळेत बंद करा.
- शहरातले सगळे हुक्का पार्लर तातडीने बंद करा.
- विनापरवानी परमिट, ऑक्रेस्टा सुरू असल्यास बंद करा.
- क्लब, हुक्का, बार, पब यावर बारीक लक्ष ठेवा.
- ध्वनीप्रदूषण, नियमांचे उल्लंघन यासंदर्भात गुन्हे नोंदवा.




