दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
तालुक्यातील डमाळे वस्ती (वनारवाडी) येथे सिमेंटचे पत्रे खोलून घरफोडी करणाऱ्या गुजरात राज्यातील एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात दिंडोरी पोलिसांना (Dindori Police) यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अवघ्या १० दिवसांत या गुन्ह्याची उकल करत पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी गेलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली तवेरा गाडी जप्त करण्यात आली आहे.
पत्र्याचे हुक खोलून केली होती चोरी
गुरुवार (दि.६ ऑगस्ट ) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डमाळे वस्ती येथील एका घराच्या पाठीमागील झाडावरून छतावर प्रवेश केला. त्यानंतर छताचे सिमेंटचे पत्रे खोलून आत शिरत कपाटातील २५ हजार रुपये रोख आणि सुमारे ४ तोळे सोन्याचे दागिने (नेकलेस, पोत व कुडते) असा ऐवज लांबवला होता. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने लागला सुगावा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही घरफोडी गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील (Walsad District) टोळीने केल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.
गुजरातमध्ये छापा टाकून टोळी जेरबंद
माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांच्या पथकाने थेट गुजरात गाठले. वलसाड जिल्ह्यातील कपराडा आणि धरमपूर तालुक्यात छापे (Raid) मारून हितेश मगनभाई दारोठीया (वय ३१, रा. माणी, ता. कपराडा) रणजीत करसन भोया (वय २९, रा. माणी, ता. कपराडा) जयंतीभाई दामजभाई दळवी (वय २२, रा. मोठी कोरवाळ, ता. धरमपूर) सालेभाई सोमल्या दळवी (वय ३०, रा. मोठी कोरवाळ, ता. धरमपूर) आणि रमन काकडभाई दळवी (वय २२, रा. मोठी कोरवाळ, ता. धरमपूर) या पाच संशयितांना ताब्यात घेतले.
तवेरा गाडी अन् मुद्देमाल जप्त
दरम्यान, संशयितांची (Suspected) कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी गुजरातहून तवेरा गाडीने (जीजे १५ बीबी १७५०) दिंडोरीतील रनतळे शिवारात आले होते. गाडी आडोशाला लावून पायी डमाळे वस्तीत जाऊन त्यांनी घरफोडी केली होती. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा सर्व मुद्देमाल आणि गाडी जप्त केली आहे.
यांनी बजावली कामगिरी
ही कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पो.हवा. अमोल साळवे, विश्वनाथ काकड, प्रदिप शिंदे, कमलेश देशमुख, विजय कोरडे, दिलीप राऊत, प्रकाश गायकवाड, विशाल पैठणकर, राहुल जोपळे, ललीत जाधव तसेच तांत्रिक विश्लेषक पो.हवा. हेमंत गिलबीले व प्रदिप बहिरम यांच्या पथकाने फत्ते केली.




