नाशिक | प्रतिनिधी
फसवणूक आणि अपहार करून उकळलेल्या पैशांतून नाशिकमध्ये हायप्रोफाईल जीवनमान जगणाऱ्या ‘ब्रोकर’ दाम्पत्याने नाशिक मधील चौघांकडून सव्वा दोन कोटी रुपये उकळले आहेत.
विशेष म्हणजे इन्कम टॅक्स (आयटी) विभागाने माझ्या घरी टाकलेल्या छाप्यात सहा कोटींची ‘कॅश’ जप्त करुन आमचे ७०० कोटींचे व्यवहार फ्रिज्ड केले आहेत, असे सांगून घरखर्चासाठी किमान पैसे द्या, असे आर्जव करून दोघांनी मदतीच्या बहाण्याने हे पैसे उकळल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, शहर आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली असून त्याची पत्नी संशयित रविना डेकाटे लिखारे हिचा शोध सुरु केला आहे.
शहरात यापूर्वी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकांचे प्रकार घडले असून त्यातील ही अतिशय वेगळ्या स्वरुपाची घटना आहे. दिंडोरी तालुक्यातील परमोरी (पोस्ट अवनखेड) येथील शेतकरी ज्ञानेश्वर संपतराव तिडके हे इन्व्हेस्टमेंट ब्रोकर असून त्यांची ओळख सन २०२४ मध्ये कृणाल याच्याशी झाली होती. यानंतर ओळख वाढत गेल्याने त्यांच्यात आर्थिक व्यवहार होत गेले व डेकाटे व तिडके कुटुंबांचे हितसंबंध वाढत गेले. तेव्हा जानेवारी २०२५ मध्ये कृणाल याने तिडके यांना भेटून ‘माझ्यावर इन्कम टॅक्सची रेड पडली आहे, त्यात माझे व पत्नीचे सर्व बँक खाते फ्रिज्ड (गोठविण्यात) केले आहेत. माझ्या मालमत्ता देखील जप्त केल्या असून छापा कारवाईत आयटीने घरातून सहा कोटी रूपये जप्त केले आहेत असे सांगितले.
तसेच, कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर सातशे कोटींचा बॅलन्स असताना तो काढण्यास अडचण येत आहे. यातून कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे, कठीण झाल्याने पन्नास लाख रुपये उसनवार द्यावेत अशी मागणी केली. त्यामुळे तिडके यांनी व्यावसायिक व कौटुंबिक हितसंबंधातून डेकाटे दाम्पत्यासह त्यांच्या तीन ते चार एजंटाकडे वेगवेगळ्या कालावधीत एकूण ६५ लाख ३९ हजार रुपये दिले. त्यापैकी फक्त एक लाख तीस हजार रुपये डेकाटे याने परत केले आहेत. बरेच दिवस उलटूनही ६४ लाख रुपये मिळत नसल्याने त्यांनी तगादा लावला, मात्र डेकाटे याने नानाविध कारणे सांगून वेळ मारून नेली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली.
दरम्यान, फसवणुकीतील रक्कम अडीच कोटींच्या घरात असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हेशाखेचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांच्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, कोल्हे यांनी कृणाल याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
यांनी पण दिली इतकी रक्कम
- ज्ञानेश्वर तिडके – ६४ लाख रुपये
- निलेश विद्युलराव वाघ यांनी – १७ लाख २८ हजार
- कुवरजित सिंग चष्ड्डा – १ कोटी १५ लाख
- शगुप्ता सैय्यद शेख – २० लाख
एकूण- २ कोटी १६ लाख रुपये
ठळक मुद्दे
कृणाल व रविना मूळचे गुजरात राज्यातील रहिवासी.
गुजरातमध्ये अशाच पद्धतीने अनेकांना फसविले.
दोघांचे बारा वर्षांपूर्वी प्रेमविवाह, दोन लहान अपत्ये आहेत.
नाशिकमध्ये तीन वर्षांपासून भाडेतत्वावर वास्तव्य,
एक चारचाकी व कागदपत्रे ताब्यात,
रविनाला एपीआय कोल्हेकडून हजर राहण्यासाठी नोटीस.
ती सध्या पसार असून तीला अटक केली जाणार.
फसवणुकीतील रक्कम व तक्रारदार वाढगार.
पैसे उकळताच मौजमजा, ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक
डेकाटे दाम्पत्य सध्या गंगापूर रोडवरील नंदनवन लॉन्सनजिकच्या ऋषिकेश बिल्डिंगमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी आतापर्यंत सर्वत्र सात ते आठ कोटी रुपये उकळल्याचा अंदाज आहे. त्यातील बरीच रक्कम केवळ मौजमजा करण्यासाठी उडविली आहे. त्यातच, त्यांनी मुलांसह परदेशवारी केल्याचे समोर येत असून काही अंशी रक्कम शेअर मार्केटिंग सह ट्रेडिंगमध्ये गुंतविल्याचे समजते. आता ईओडब्ल्यू अर्थात आर्थिक गुन्हेशाखेने डेकाटे यांचे बँक खाते फ्रिज्ड केले असून स्टेटमेंटनुसार तपास केला जात आहे. रविनाचा शोध सुरु असून दोघांनाही नातलग नसल्याचे कळते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




