नाशिक | Nashik
जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या भावली धरण (Bhavali Dam) आणि धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर टवाळखोरांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तरुणीच्या (Girl) छेडछाडीला विरोध केल्यामुळे चिडलेल्या गुंडांनी तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने कुटुंबाच्या टाटा सफारी (SUV) गाडीवर भीषण हल्ला केला. या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिक शहरात (Nashik City) राहणाऱ्या पुनम भागवत या रविवारी आपल्या कुटुंबातील ८ सदस्यांसह भावली धरणावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. पर्यटन आटोपून परतत असताना दोन टवाळखोरांनी भागवत यांच्या कुटुंबातील एका महिलेची छेड काढली. या प्रकारावर भागवत आणि त्यांच्या पतीने आक्षेप घेत, “सार्वजनिक ठिकाणी असे वागणे योग्य आहे का?” असा जाब विचारला. यावरून टवाळखोरांनी वाद घालत थेट अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी प्रतिकार केल्यावर ते तिथून पळून गेले.
१० ते १५ किलोमीटर थरारक पाठलाग आणि हल्ला
काही अंतरावर उभा असलेल्या एका टेम्पो जवळील ८ ते १० जण पुन्हा भागवत कुटुंबाशी हुज्जत घालू लागले. वाद वाढू नये म्हणून भागवत कुटुंब आपल्या टाटा सफारी गाडीतून तिथून निघून गेले. मात्र, चिडलेल्या टवाळखोरांनी एका पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधून आणि दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. गुंडांनी जवळपास १५ किलोमीटरपर्यंत गाडीचा थरारक पाठलाग केला. हातात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन धावत्या गाडीवर ठिकठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात सफारी कारच्या समोरील आणि मागील काचा पूर्णपणे फुटल्या. गाडीत बसलेल्या महिलांना काचा लागून किरकोळ दुखापतही झाली आहे. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत चालकाने प्रसंगावधान राखत गाडी वेगाने पळवून थेट अंबड पोलीस ठाणे गाठले.
पोलीस तपास आणि कारवाई सुरु
दरम्यान, भागवत कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली आहे. व्हायरल व्हिडिओ आणि गाडीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत ६ ते ७ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता पर्यटकांकडून केली जात आहे.




