Wednesday, May 13, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पत्नीच्या छळास कंटाळून पंचवटीत आरोग्यसेवकाची आत्महत्या

Nashik Crime News : पत्नीच्या छळास कंटाळून पंचवटीत आरोग्यसेवकाची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संसारातील वाढता कलह, पत्नीकडून होणारा मानसिक छळ आणि पोटच्या मुलाला भेटण्यासाठी घातलेली बंदी… याच विवंचनेतून एका ३६ वर्षीय तरुण आरोग्य सेवकाने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना पंचवटीत (Panchvati) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी (Suicide) तयार केलेले ‘कॉल रेकॉर्डिंग’ आता संशयित पत्नीच्या मुसक्या आवळण्यासाठी मुख्य पुरावा ठरले आहेत.

- Advertisement -

केदार दिनेश भस्मे (मूळ रा. साईपर्ल्स, बदलापूर इस्ट, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या आरोग्य सेवकाचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) मृत केदारची पत्नी संशयित शिवानी केदार भस्मे, सासू माया हटवार आणि सासरे रामभाऊ हटवार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. केदार भस्मे यांची नुकतीच जळगाव जिल्हा परिषदेत ‘आरोग्यसेवक’ म्हणून नियुक्ती झाली होती. सरकारी नोकरी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. नियुक्तीनंतरच्या प्रशिक्षणासाठी ते गेल्या काही महिन्यांपासून पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील वडजाई माता मंदिराजवळ भाडेतत्वावरील खोलीत राहत होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, जून २०२४ ते एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. केदार आणि शिवानी या दोघांचाही हा स्वतंत्रपणे दुसरा विवाह होता. या विवाहातून त्यांना एक अपत्य आहे. मात्र, पती-पत्नीमधील वादांमुळे शिवानी अपत्यासह वेगळी राहत होती. केदार यांना आपल्या मुलाबद्दल ओढ होती, परंतु शिवानीने मुलाला भेटू देण्यास मनाई केली होती. पोटच्या मुलाला पाहण्यासाठी व्याकुळ झालेल्या बापाचा हा मानसिक कोंडमारा आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक पुराव्यांतून समोर आले आहे. शिवानीने स्वतःच्या भावाच्या लग्नासाठी आणि स्वतःच्या खर्चासाठी केदार यांच्याकडे सातत्याने पैशांचा तगादा लावला होता. यात तिचे आई-वडील (सासू-सासरे) देखील तिला साथ देऊन केदार यांना मानसिक त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून १७ एप्रिल रोजी केदार यांनी वडजाईमाता नगरातील घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

‘डिजिटल’ पुरावा निर्णायक

सुरुवातीला या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, केदार यांचे वडील डॉ. दिनेश माणिकराव भस्मे (वय ६०) यांनी मुलाच्या सामानाची तपासणी केली. तेव्हा गंभीर वास्तव समोर आले. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी केदार यांनी पत्नीकडून मिळणाऱ्या धमक्या, छळ आणि मानसिक छळाचे स्पष्ट ‘व्हिडिओ’ आणि ‘कॉल रेकॉर्डिंग’ करून ठेवले होते. हे सर्व पुरावे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण सखोल तपास करत आहेत. मोबाईलमधील रेकॉर्डिंग आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले जात असून संशयितांचा शोध सुरु आहे.

ताज्या बातम्या

धक्कादायक : कौटुंबिक वाद विकोपाला; सुनेकडून सासूची हत्या

0
पुणे | प्रतिनिधी Pune पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका ६० वर्षीय सुनेने आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध सासूचा चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक...