नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कारागृहांची (Jail) सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम आणि आधुनिक करण्यासाठी शासन स्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यासारखा वाहिला जात आहे. गृह विभागाकडून राज्यातील तुरुंगांसाठी हायमास्ट पोल आणि बॅगेज स्कॅनर खरेदीसाठी तब्बल २३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. एकीकडे शासनाचा हा सुरक्षा यज्ञ अविरत सुरू असताना, दुसरीकडे कैद्यांपर्यंत पोहोचणाऱ्या वस्तूंनी मात्र प्रशासनाच्या या अत्याधुनिक यंत्रणेला चोहोबाजूने गुंडाळून ठेवल्याचे चित्र आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) सुरक्षेची जबाबदारी असलेले रक्षकच तस्कर बनल्याची घटना उजेडात आल्यानंतर, या कोट्यवधींच्या निधीचे करायचे काय, असा प्रश्न आता सुजाण नागरिकांमधून विचारला जात आहे.
नाशिकराेड मध्यवर्ती कारागृहात माेबाइलचा (Mobile) वापर, रील बनवण्याचे प्रकार, आपापसातील हाणामारी आणि लाचखोरीचे किस्से नवे नाहीत. त्यात भर म्हणून आता रक्षकांच्या माध्यमातूनच अमली पदार्थांची तस्करी होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कर्तव्य बजावणारा तुरुंग रक्षक रवींद्र एकनाथ पाटील याला चक्क गुप्तांगात चरस लपवून आत नेताना रंगेहात पकडण्यात आले. ३३ ग्रॅम चरस बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली असली, तरी या घटनेने संपूर्ण तुरुंग प्रशासनाच्या यंत्रणेवर आणि प्रवेशद्वारावरील तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
निधी भरभरून, मग त्रुटी कुठून?
तुरुंगांमधील बेकायदेशीर हालचालींना आळा घालण्यासाठी ३८९ हायमास्ट पोल आणि ३७ बॅगेज स्कॅनर यांसारखी आधुनिक उपकरणे खरेदी करून पुरविण्यात आली आहेत. यासाठी लागणारा २३.३७ कोटी रुपयांचा निधीही आता सुपूर्द करण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता आणि जेम पोर्टलमार्फत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून साहित्य घेतले जाईल.
प्रत्यक्ष वास्तव
प्रवेशद्वारावर अत्याधुनिक स्कॅनर असताना आणि रात्रीचा अंधार घालवण्यासाठी हायमास्ट पोल उभारले जात असतानाही, खाकी वर्दीतील रक्षकाच्या माध्यमातून असा अवैध माल आत कसा पोहोचतो, याची चर्चा आता रंगू लागली आहे. सुरक्षिततेसाठी शासन हवे तेवढे धन आणि संसाधने उपलब्ध करून देत आहे. मात्र, यंत्रणेतील काही मोजक्या घटकांचे असे अतिउत्साही प्रताप या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरताना दिसत आहेत. त्यामुळे आता केवळ कोट्यवधी रुपयांची उपकरणे बसवून भागणार नाही, तर खाकी डागाळणाऱ्यांना शोधून तुरुंगाची ‘शुद्धता’ करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.




