नाशिक | प्रतिनिधी | Nashk
आरोग्यसेविका दीपाली पवार आत्महत्या (Deepali Pawar Suicide Case) प्रकरणात पती संशयित अनिल सोन्याबापू पवार याच्या पोलीस कोठडीत (Police Custody) येत्या ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. ९) रोजी न्यायालयात सुनावणीदरम्यान दीपालीच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढल्याची बाब समोर आल्याने या तपासाला वळण मिळाले आहे. हा सीडीआर (CDR) कोणाच्या आदेशावरून काढण्यात आला, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
दीपालीच्या वडिलांनी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) दिलेल्या तक्रारीनुसार, पती संशयित अनिल पवार तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आराेप आहे. तसेच अहिल्यानगर येथील तिच्या नावावरील फ्लॅट भावाच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या त्रासाला कंटाळून दीपालीने ४ ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांकडून पतीला अटक करण्यात आली आहे.
सुनावणीदरम्यान दीपालीच्या बाजूचे वकील ॲड. मयूर काळे यांनी युक्तिवाद केला. मोबाईल सीडीआरच्या मुद्द्यावरून चारित्र्यावरील संशयाच्या आरोपांना बळ मिळते. कोठडीच्या कालावधीत आणखी पुरावे एकत्र करून संशयितास कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दीपाली यांच्या मुलाने चित्रित केलेला व छळाचा दावा असलेला एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची सत्यता पडताळणे बाकी आहे. पोलिसांसमोर आता सर्व पुरावे तपासून तपास करण्याचे आव्हान आहे.




