नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील हिरावाडी (Hirawadi) येथील ‘समृद्धी ज्वेलर्स’वर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या (Robbery) गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपींना नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Nashik Police Crime Branch ) पंजाब राज्यातून शिताफीने अटक केली आहे. १५ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास ६ अज्ञात आरोपींनी बंदूक आणि एअरगनचा धाक दाखवून सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दुकानचालक नैना पगारिया यांच्या धाडसी प्रतिकारामुळे दरोडेखोरांचा मोठा मनसुबा फसला व ते काही दागिने घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ व २ च्या पथकांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित पंजाबमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने मोहाली (पंजाब) येथे जाऊन सलग ३ दिवस अहोरात्र परिश्रम घेतले.
दरम्यान, या धडक कारवाईत पोलिसांनी (Police) हनिषकुमार महेंद्रासिंग (वय ४७, रा. डेराबस्सी, मोहाली) आणि रणजितसिंग दर्शनसिंग (वय ५२, रा. बहादरपूर फकीरा, पटियाला) या दोन आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. अटक (Arrested) केलेल्या आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.




