नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील (Maharashtra-Gujarat Border) सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर नाशिक ग्रामीणच्या (Nashik Rural) स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धाडसी कारवाई करत गुजरात राज्यातील कोट्यधीश आणि लँडलॉर्ड जुगारींना रंगेहात पकडले आहे. सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बर्डीपाडा गावाजवळील एका हॉटेलमागे सुरू असलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७३ लाख २ हजार ३७० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या आदेशान्वये ही धाड टाकण्यात आली. गुजरात सीमेलगत असलेल्या सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा येथील हॉटेल एन.जी. हिल्सच्या मोकळ्या जागेत तीन पत्ती नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीचे पाेलीस निरीक्षक राहुल माेरे, सुरगाणा पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक याेगेश घाेरपडे, सहायक निरीक्षक गायत्री जाधव, दीपक निगळ यांच्यासह हवालदार प्रितम लाेखंडे, माधव साळे, पारखे, अमलदार बाेडके, महिला अमलदार गायकवाड यांच्यासह पथकाने पाेलिसांनी रविवारी (दि. ४) पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली.
या धाडीदरम्यान पोलिसांनी सुरतमधील उच्चभ्रू भागासह वलसाड, नवसारी, दादरा-नगर हवेली (सिल्वासा) येथील बड्या व्यावसायिकांना जुगार खेळताना ताब्यात घेतले. यामध्ये गुजरात राज्यातील नामवंत उद्योगपती, जमिनीचे व्यवहार करणारे लँडलॉर्ड आणि कोट्यधीशांचा समावेश आहे. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्या भारतीय न्याय संहिता कलम २२१ सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. सर्व १६ संशयितांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक मनोज कुवर करत आहेत.
कारवाईदरम्यान सूत्रधाराचा गोंधळ
पोलिसांनी छापा (Raid) टाकला असता, हा जुगार अड्डा चालवणारा मुख्य संशयित श्याम नागू पवार (वय ३९, रा. दवाखानापाडा, सुरगाणा) याने पोलीस पथकाच्या कारवाईत अडथळा आणत गोंधळ घातला. यामुळे पोलिसांनी त्याच्यावर जुगार कायद्यासोबतच शासकीय कामात अडथळा आणि संबंधित कलमान्वये अतिरिक्त गुन्हा दाखल केला आहे.
या जुगारींवर गुन्हा
१) श्याम नागू पवार (सुरगाणा), २) विजयभाई चंदुभाई उकाळे (सूरत), ३) जिग्नेशभाई पुरुषोत्तमभाई सावलिया (सूरत), ४) राधाकृष्ण काशीप्रसाद दुबे (वापी, वलसाड), ५) अनुराग प्रफुल शहा (नवसारी), ६) केशव बाबूलाल वसावा (सूरत), ७) यश संजयभाई चोटलिया (सिल्वासा), ८) साजिदभाई शरीफ शेख (वलसाड), ९) जितेंद्र यश गिरी (वलसाड), १०) अश्विन राजूभाई शहा (वलसाड), ११) गुलाम मोहिउद्दीन अब्दुल मन्सुरी (सूरत), १२) हितेश सुरेशभाई पटेल (सूरत), १३) साहिब मेहबूब शेख (सूरत), १४) अब्दुल जुबेर रफिक शेख (सूरत), १५) मुश्ताक शेख रफोद्दीन (सूरत), १६) आरिफ शकील शेख (सूरत).
जप्त मुद्देमाल असा
- रोख रक्कम व मोबाईल: २,०३,८७० रुपये रोख
– १,९८,५०० रुपयांचे महागडे मोबाईल फोन
- ६९ लाखांची दहा चारचाकी अलिशान वाहने
– एकूण जप्त मुद्देमाल: ७३ लाख २ हजार रुपये.




