नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दिंडोरी रोड परिसरात (Dindori Road Area) भरदिवसा पोलीस (Police) असल्याची बतावणी करून एकाला बंदुकीचा धाक दाखवत ७० लाखांची रोकड लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली असून, संशयितांकडून ८२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
(दि. ८ जुलै) दिंडोरी रोड, पंचवटी परिसरात सरकारी दिवा लावलेल्या इनोव्हा कारमधून आलेल्या दोन पुरुष व एका महिलेने फिर्यादीला आपण पोलीस असल्याचे सांगितले. बंदुकीचा धाक दाखवून त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविण्यात आले. त्यानंतर फिर्यादीच्या पिशवीतील ७० लाखांची रोकड आणि मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. अखेरीस मुंबईपुणे महामार्गावर फिर्यादीला सोडून संशयित पसार झाले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. संशयित मुंबईकडे गेल्याचे समजताच पथकांनी जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई-विरार परिसरात शोधमोहीम राबवून अखेर चौघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, अटक (Arrested) करण्यात आलेल्यांमध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा (४०, रा. आझमगड, उत्तर प्रदेश), सुजितकुमार राजकिशोर दुबे (३२,रा. धनबाद, झारखंड), निलेश अशोक पका (२७, रा. वसई) आणि संगीता हंसराज अहिरे (४३, रा. नाशिक, मूळ जळगाव) यांचा समावेश आहे.




