नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप असलेला संशयित अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याच्या गुन्ह्यांमध्ये आता त्याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक गैरव्यवहारात संशयित (Suspected) असल्याने तिच्यावर अहिल्यानगरमधील राहाता आणि नाशिक ग्रामीणच्या सिन्नर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. यापैकी राहाता येथील गुन्ह्यात तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर आज, गुरुवारी (दि. १६) सुनावणी होणार आहे
स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या खरातने पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला परदेशातील पूजाविधीचे आमिष दाखवून लुटले. इतकेच नव्हे तर, मुंबईतील (Mumbai) एका हॉटेल व्यावसायिकाच्या नावे पतसंस्थेत बनावट खाते उघडून कोट्यवधींचे गैरव्यवहार केले. पोलिसांनी पतसंस्थेतील खातेधारकांना नोटिसा बजावल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. राहाता पोलिसांत खरातसह समता पतसंस्थेच्या तत्कालीन मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल असून, पोलिसांनी (Police) सर्व खातेधारकांची पडताळणी सुरू केली आहे. या प्रकरणात कल्पना खरात संशयित असून ती ४ एप्रिलपासून पसार आहे. ती परदेशात गेल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे लूकआऊट नोटीसने नेमके काय सिद्ध केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आलिशान कार जप्त
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खरातच्या कर्मयोगीनगरातील बंगल्यातून एक आलिशान मर्सिडीज कार (एमएच १५ जीएल ८१८१) सील केली आहे. ही ९० लाख रुपयांची कार खरातने एका बांधकाम व्यावसायिकाला पूजेसाठी वाहन हवे असे सांगून खरेदी करायला लावली आणि नंतर स्वतःच्या नावावर करून घेतली होती. कल्पना खरात हिने अद्याप सिन्नर किंवा नाशिक न्यायालयात धाव घेतलेली नाही. अहिल्यानगर आणि नाशिक ग्रामीण पोलिसांची पथके तिच्या मागावर असून, तिला अटक झाल्यानंतर खरातचे आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.




