नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंडित कॉलनीतील बालगणेश उद्यानाजवळ मंगळवारी भल्या पहाटे घडलेल्या आकाश धनवटे याची कट रचून हत्या केल्याप्रकरणात त्याच्या लहान भावाने मोठा खुलासा केला आहे. आकाशची हत्या करण्यासाठी भाजपाच्या माथाडी सेलचा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे आणि मकरंद देशमुख यांनी ही हत्या करण्यासाठी अथर्व दाते व त्याच्या साथीदारांना सांगितले होते. त्यानुसार आकाशची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे याआधी खून, प्राणघातक हल्ल्यांसह खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्या भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, प्रकरणात तिघांना अटक करण्यात आल्यावर न्यायालयाने तिघांना (दि २) पुढील पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली असून पसार संशयितांचा शोध सुरु झाला आहे.आकाश उर्फ शुभम् संतोष धनवटे (वय २२, रा. घारपुरे घाट, अशोकस्तंभाजवळ, नाशिक) असे प्राणघातक हल्याच्या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो महापालिकेच्या खासगी ठेकेदारामार्फत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होता. घटनेनंतर काही तासांच सरकारवाडा पोलीस व युनिट एकच्या पथकाने संशयित हल्लेखोर अथर्व अजय दाते (वय २०, रा. घारपुरे घाट, अशोकस्तंभ), मकरंद देशमुख (रा. नाशिक), अभय विजय तुरे (वय १९, रा. हेमलता टॉकीजजवळ, रविवार पेठ) आणि एक अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले.
आता घटनेत इतर संशयितांसह मोरेचा सहभाग समोर येत असल्याने पोलीस कसोसीने तपास करत आहेत. त्यानुसार पथक वरिष्ठांच्या सूचनेने तपास करत असून संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. या खून प्रकरणी मृत आकाशचा भाऊ मकरंद उर्फ सोमा धनवटे (वय २०, रा. गोदावरीनगर, घारपुरे घाट) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सुखदेव काळे करत असून संशयितांना ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
फिर्यादीचा दावा
सन २०२१ मध्ये संशयित व मृत आकाश यांच्यात हाणामारी झाली होती. त्याबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. त्यातून संशयितांनी हा गुन्हा मागे घेण्यासाठी किंवा न्यायालयात त्या गुन्ह्याबाबत साक्ष न देण्यासाठी आकाशला वेळोवेळी धमकावले. त्यानंतर (दि. १) सकाळी पावणेसात वाजता आकाश रस्ते साफसफाईचे काम करत असतांना संशयित व्यंकटेश मोरे, मकरंद देशमुख यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या टोळीतील अथर्व दाते, अभय तुरे, एक अल्पवयीन आणि अन्य दोघांनी धारदार कोयत्यांनी आकाशच्या तोंडावर, डोक्यावर, पाठीवर सपासप वार करून ठार करण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद मकरंद धनवटे याने दिली आहे. मात्र, उपचारादरम्यान, आकाशचा दुपारी मृत्यू झाला.
सबळ पुरावे नाहीत
या खून प्रकरणात घटनास्थळी वा अन्य ठिकाणी भाजप पदाधिकारी व्यंकटेशचा प्रत्यक्ष सहभाग अद्याप आढळलेला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजही तपासले असून त्यात मोरे यास अटक होईल, इतपत सबळ पुरावे अद्याप पोलिसांसमोर आले नसल्याने आता सखोल तपास आणि सबळ पुराव्यानिशी मोरेवर कारवाईची शक्यता आहे.
ठळक मुद्दे
बुधवारी सकाळी काही पदाधिकाऱ्यांची सरकारवाडा पोलिसांत गर्दी.
संशयितांत मोरेचे नाव आल्याने राजकारण्यांत खळबळ.
मृत आकाश व संशयितांत चार ते पाच वर्षांपासून वाद होते.
आकाशवर पाळत ठेऊन हल्ला.
आकाशच्या शरीरावर ११ खोलवर वार