नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे (Sant Nivruttinath Maharaj Sansthan) विद्यमान अध्यक्ष राहुल साळुंखे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून २९ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, अत्याचाराला कंटाळून २९ वर्षीय पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता असे समाेर आले असून तिने शुक्रवारी(दि. २) पाेलीस ठाण्यात साळुंखेविराेधात जबाब नाेंदविला असून ताे पसार झाला आहे.
पुण्यातील (Pune) बारामती तालुक्यात (Baramti Taluka) राहणाऱ्या पीडितेच्या भावाने २४ सप्टेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात २९ वर्षीय बहिणीसह सहा वर्षांच्या भाचीचे अपहरण केल्याची फिर्याद नोंदवली होती. या तक्रारीवरून सुरुवातीला संशयित राहुल साळुंखे आणि बाकेराव ढेमसे यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासात व पाेलिसांच्या माहितीनुसार पीडिता आणि साळुंखे हे गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये होते. शुक्रवारी (दि. २) पीडित महिलेने इंदिरानगर पोलिसांकडे नोंदवलेल्या नव्या जबाबानंतर या गुन्ह्यात शारिरीक शाेषण, लग्नाचे खाेटे आमिष अशी अतिरिक्त कलमे वाढवण्यात आली आहेत.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच महिलेने तक्रार दिल्यानंतर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी (Police) उशीर का केला? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला. याशिवाय, पीडितेने यापूर्वी निवृत्तीनाथ संस्थानच्या सचिवांसह काही विश्वस्तांना साळुंखे याच्या अत्याचाराबाबतचे व्हिडिओ पाठवून कारवाईची मागणी केली होती. मात्र, अध्यक्ष साळुंखे याच्या मर्जीतील विश्वस्तांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला का, असाही सवाल आता वारकरी वर्गातून विचारला जात आहे. राहुल साळुंखे याच्यावर यापूर्वी पंढरपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहात संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचा आणि सुवर्ण महोत्सवाचा वापर करून लाखो रुपयांची देणगी बेकायदेशीरपणे वसूल केल्याचा आरोप काही सेवाभावी व्यक्तींनी केला होता. या आर्थिक गैरव्यवहाराचीही चौकशी सध्या सुरू आहे.
राजीनाम्याची मागणी
पाथर्डी शिवारातील ह.भ.प. असलेला राहुल साळुंखे सध्या पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ज्ञानोबा-तुकोबांच्या उच्च विचारांवर चालणाऱ्या वारकरी संप्रदायाची प्रतिमा या प्रकारामुळे मलीन झाली आहे. त्यामुळे अशा डागीत व्यक्तीला संस्थानवर राहण्याचा अधिकार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, सरचिटणीस पुंडलिक थेटे, कार्याध्यक्ष पांडुरंग गडकरी, गुरुवर्य अण्णा महाराज आहेर यांच्यासह साहेबराव आनवट आदींनी व्यक्त केली आहे. साळुंखेने तातडीने राजीनामा द्यावा अथवा धर्मदाय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला त्वरित निलंबित करावे, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे.




