Friday, May 15, 2026
Homeक्राईमNashik Crime News : गंगाधर ही शक्तिमान है! तोतया सबनीस निघाला पत्रकार...

Nashik Crime News : गंगाधर ही शक्तिमान है! तोतया सबनीस निघाला पत्रकार एरंडे; १० जणांना १३ लाखांचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘गंगाधर ही शक्तिमान आहे’ हा लोकप्रिय संवाद आपण सर्वांनीच ऐकला आहे. पण नाशिकमध्ये (Nashik) याच धर्तीवर एका संशयिताने रचलेला बनावट नावाचा खेळ आता उघड झाला आहे. स्वतःची ओळख ‘राजेंद्र दयाराम सबनीस’ अशी सांगून आदिवासी विकास विभागात नोकरीचे आमिष दाखवणारा तोतया अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून, सध्या लैंगिक शोषण आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात कोठडीत (Custody) असलेला वादग्रस्त पत्रकार रवींद्र गणपत एरंडे (Ravindra Erande) असल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

सातपूर पोलिसांनी (Satpur Police) एरंडेला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक (Arrested) केल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहताच फिर्यादी माधुरी मोहन चौधरी (२९, रा. तारवालानगर) यांना धक्काच बसला. ज्या ‘सबनीस’ नामक व्यक्तीने आपल्याला आणि नातेवाईकांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले, तोच हा एरंडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोशल मीडियावरील त्या व्हायरल फोटोंनी जणू ‘गंगाधर ही शक्तिमान है’ या सत्याचा उलगडा केला आणि एका मोठ्या रॅकेटचा चेहरा समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च ते ऑगस्ट २०२४ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. एरंडे याने स्वतःचे नाव मराजेंद्र सबनीसफ असल्याचे सांगून आपण आदिवासी विकास आयुक्तालयात मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे भासविले. सातपूर बसस्टॉप, आदिवासी विकास भवन आणि गोल्फ क्लब मैदान अशा ठिकाणी त्याने माधुरी चौधरी यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. सुरुवातीला नोकरीसाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती. माधुरी यांनी २ लाख रुपये दिले. मात्र, हव्यास संपत नव्हता. दोन लाखात काम होणार नाही, आणखी कोणी इच्छुक असतील तर सांगा, असे म्हणून त्याने जाळे पसरवले. नोकरीच्या आशेने माधुरी यांनी आपल्या ९ नातेवाईकांनाही यात सामावून घेतले.

फसवणूक झालेले पीडित

माधुरी चौधरी यांच्यासह विशाल साबळे, महेंद्र साबळे, भूषण बहिरम, राहुल बहिरम, शुभम कोकणी, साईनाथ चौरे, शीतल बहिरम, ज्ञानेश्वर साबळे आणि अजय बहिरम या तरुणांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

१० जणांची आर्थिक लूट

यानंतर एरंडे ऊर्फ सबनीस याने केवळ आमिषच दाखवले नाही, तर विश्वास संपादन करण्यासाठी चक्क बनावट नियुक्ती आदेशदेखील दिले. एकूण १० सुशिक्षित बेरोजगारांकडून त्याने वेळोवेळी १३ लाख ८० हजार रुपये उकळले. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून एरंडेचे १२१ आक्षेपार्ह व्हिडिओ हस्तगत केल्यानंतर आता हा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा त्याच्या अडचणीत वाढ करणारा ठरणार आहे.

ताज्या बातम्या