नाशिक | प्रतिनिधी | Nashik
ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) आणि सायबर गुन्ह्यांमधील (Cyber Crime) काळा पैसा सुरक्षितपणे वळवण्यासाठी सायबर चोरट्यांनी गुन्हेगारीची पद्धत बदलली आहे. आत्तापर्यंत केवळ बँकांच्या (Bank) म्यूल अकाउंट्सचा वापर करणाऱ्या चोरट्यांनी आता डिजिटल रेंटल म्यूल आणि व्हर्चुअल वॉलेट्सचा अँगल शोधून काढला आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण सायबर पोलिसांनी या नव्या जाळ्याचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली असून, बँक खात्यांबरोबरच आता भाड्याने दिलेल्या डिजिटल वॉलेट्स, इ-कॉमर्स गिफ्ट कार्ड्स आणि भाड्याच्या सिमकार्ड्सचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात असल्याची बाब समोर आली आहे.
सायबर गुन्हेगार पूर्वी सर्वसामान्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती (Bank Account) वापरत असत. मात्र, पोलिसांनी बँक खाती फ्रीज्ड करण्यास सुरुवात केल्यावर चोरट्यांनी पळवाट शोधली. आता ते विद्यार्थी, गृहिणी आणि बेरोजगारांना लक्ष्य करत आहेत. ‘तुम्हाला दरमहा ५ ते १० हजार रुपये मिळतील, फक्त तुमचे इ-वॉलेट आणि तुमच्या नावे असलेले सिमकार्ड आम्हाला वापरायला द्या’ असे सांगून हे डिजिटल डिटेल्स भाड्याने घेतले जातात.
फसवणुकीचे पैसे (Money) थेट बँकेत न आणता या भाड्याच्या इ-वॉलेटमध्ये आणले जातात. तिथूनअॅमेझॉन/फ्लिपकार्टचे गिफ्ट व्हाउचर्स किंवा क्रिप्टो करन्सी (यूएसडीटी) खरेदी करून पैसे आंतरराष्ट्रीय स्तरावर वळवले जातात. हे व्यवहार सेकंदांमध्ये पूर्ण होत असल्याने पोलिसांना (Police) तांत्रिक तपासात अडथळे निर्माण होतात. नाशिकमध्ये ९० हन अधिक खात्यांवर कारवाई झाली असून दीड कोटीहून अधिकचा संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
काय आहे डिजिटल म्यूल?
म्यूल म्हणजे ओझे वाहणारा. सायबर चोरटे चोरलेला पैसा थेट स्वतः च्या खात्यात न घेता, तो वळवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे बँक खाते, इ-वॉलेट, यूपीआय आयडी किंवा सिमकार्ड वापरतात. या साखळीत स्वतःचे डिजिटल तपशील भाड्याने किंवा कमिशनवर देणारी व्यक्ती नकळतपणे डिजिटल म्यूल बनते. सायबर गुन्ह्यांमध्ये ज्याच्या खात्यावर किंवा डिजिटल वॉलेटमध्ये पैसे जमा होतात, तो कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्यातील सहसंशयित ठरतो. किरकोळ कमिशन किंवा ‘भाड्याच्या मोहात पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
नाशिकमध्ये सहा गुन्हे
नाशिक शहर व ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यांमध्ये आत्तापर्यंत ९० बँक खातेधारकांवर सहा गुन्हे दाखल झाले आहेत. या खात्यांमधून एक कोटी ५१ लाख ४७ हजार २५७रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये नाशिक शहरातील ८६ आणि ग्रामीण भागातील ४ खात्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या तपासात आता या खात्यांशी जोडलेले डिजिटल वॉलेट्स आणि भाड्याने दिलेली सिम कार्ड्स ही गुन्ह्याचा मुख्य कणा असल्याचे स्पष्ट होत आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
– खाते किंवा सीमकार्ड भाड्याने देऊ नका.
– टस्क फ्रॉड व पार्टटाइम जॉबपासून सावध राहा.
– ओटीपी आणि क्यूआर कोड शेअर करू नका.
– सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर किंवा संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.




