नाशिक | प्रतिनिधी
सावतानगर परिसरात एका सराईत रेकॉर्डवरील तडीपार असणाऱ्या गुन्हेगाराने कोयत्याने दोन जणांवर गंभीर स्वरूपाचे वार करून परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रकार बुधवारी रात्री केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात नागरिकांनी गर्दी करून तात्काळ संबंधित कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर कारवाईची मागणी केली.
बुधवारी (दि.५) रात्री दहा च्या सुमारास रेकॉर्ड वरील संशयित गुन्हेगार पवन वायाळ याच्यासह अन्य दोन जणांनी परिसरात कोयते घेऊन नागरिकांना शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी रस्त्यावर मित्रांसोबत गप्पा मारत उभे असलेले पंकज प्रल्हाद देसले (३७, रा. सावतानगर) यांच्यावर पवन वायाळ याने कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. येथून पुढील पाच ते दहा मिनिटात त्रिमूर्ती चौकात कमल वाईन शॉप समोर उभे असलेला अमोल शिंदे याच्यावरही कोयत्याने वार करून त्याला जखमी केले.
यासह अन्य दोन-तीन जणांवर कोयते उगारल्याची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. संशयित आवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित पवन वायाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा